छापेमारीत दीड कोटीचा खतसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर : कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने बुटीबोरी परिसरातील दोन गोदामांवर छापेमारी करीत तब्बल एक कोटी 61 लाख 47 हजार 547 रुपयांचा अवैध खतसाठा जप्त केला आहे. या खताच्या साठ्यासोबतच जैविक औषधी तयार करण्याचे आणि पॅकेजिंगचे साहित्यदेखील या गोदामातून मिळून आले. या प्रकरणी सतीश नरहरीशेट्टीवार त्याची पत्नी सोनाली आणि मंगेश कोमावार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मेसर्स गजानन फर्टिलायझर प्रा. लिमिटेड या कंपनीची नोंदणी बी-2/4, इंडोरामा कॅफे नं. 2, एम.आय.डी.सी. बुटीबोरी, हिंगणा या पत्त्यावर होती. जुलै 2014 ते जुलै 2017 अशी त्यांच्या परवान्याची मुदत होती. परंतु, जुलै 2017 मध्ये परवान्याची मुदत संपली असताना परवान्याचे नूतनीकरण न करताच त्याच नावावर खत आणि जैविक औषधे उत्पादन सुरूच ठेवण्यात आले. उत्पादित खत आणि जैविक औषधांचा साठा बुटीबोरी परिसरातील भाडेतत्त्वावरील दोन गोदामांत करण्यात आला. याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. डी. देशमुख यांना मिळाली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांना त्यांनी याबाबत कळवीत कारवाईसाठी परवानगी घेतली. त्यांच्याच मार्गदर्शनात नंतर करण्यात आलेल्या छापेमारीत तब्ब्ल दीड कोटी रुपयांचे घबाड हाती लागले आहे. जप्त नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी सतीश विलासराव नरहरीशेट्टीवार, सोनाली सतीश नरहरीशेट्टीवार तसेच मंगेश कोमावार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half crore fertilizers seized