६७.५० लाखांच्या रोकडसह एक ताब्यात

६७.५० लाखांच्या रोकडसह एक ताब्यात

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर येऊन थांबलेल्या जीटी एक्‍स्प्रेसमध्ये धडक देत ६७.५० लाखांची रोख घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्‍या आवळल्या. ही रक्कम हवालाची असावी असा संशय असून हे प्रकरण पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे. 

पूर्णानंद रामचंद्र मिश्रा (४८) रा. नाईक गल्ली, इतवारी पोस्ट ऑफिसजवळ असे ताब्यातील व्यक्तीचे नाव आहे. दुपारी १.०५ वाजताच्या सुमारास नवी दिल्ली - चेन्नई जीटी एक्‍स्प्रेस नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर येऊन थांबताच तो एस-८  क्रमांकाच्या डब्यात जाऊन बसला. विकास शर्मा आणि उषा तिग्गा नियमित तपासणीसाठी त्याच डब्यात शिरले. 

 तपासणीदरम्यान बर्थ क्रमांक ४४ वर मिश्रा बसून दिसला. वरच्या बर्थवरील बॅग बघताच त्यांना शंका आली. बॅग उचलण्याचा प्रयत्न केला ती फारच वजनी होती. विचारणा करताच मिश्राने बॅगमध्ये रोख रक्कम असल्याची माहिती दिली. लाखोंची रक्कम असल्याने मिश्राला ठाण्यात आणण्यात आले. बॅग उघडताच दोन हजार आणि पाचशेच्या नोटांचे दोन मोठे पॅकेट आढळले. या नोटा एकूण ६७.५० रुपयांच्या आहेत.

ही माहिती लागलीच वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्‍त ज्योतीकुमार सतिजा यांना देण्यात आली. सतिजा यांनी पैशांशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. पण, मिश्राने ही ‘अन अकाउंटेड’ रक्कम असून कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली. लागलीच घटनेची माहिती देऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. कायदेशीर कारवाईनंतर आरोपी आणि रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली. 

आरोपीकडून संदिग्ध उत्तरे  
मिश्रा स्वत: सराफा व्यवसायी असल्याचे सांगतो. इतवारीतील सराफांकडून रक्कम घेऊन तो चेन्नईतील पार्टीला देण्यासाठी जात असल्याचे समजते. कच्ची पट्टीत व्यवहार करीत असल्याचे तो सांगतो. पण, सराफा व्यवसायावर अनेक निर्बध आहेत. दुसरे ही रक्कम हवालाची असण्याची दाट शंका आहे. देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच मोठी रक्कम आढळल्याने ती निवडणुकीत वापरण्याची तयारी असावी, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com