भामरागडमध्ये शंभर घरे पुराच्या पाण्याखाली

file photo
file photo

गडचिरोली : आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भामरागड जलमय झाले आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे येथील शंभरहून अधिक घरे पाण्यात बुडाली आहेत. मागील दहा दिवसांत चार वेळा पुरामुळे मुख्य रस्ता बंद झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तीनशेवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून मतदकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टीने नागरिक त्रस्त असून सततच्या पावसाने धान पीकही संकटात सापडले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्‍याला बसला आहे. या तालुक्‍यातील 120 गावे आठ दिवसांपासून संपर्काबाहेर असून जिल्ह्यातील जवळपास 400 गावांना पुराचा फटका बसला आहे. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्‍याला छत्तीसगडमध्ये झालेल्या पावसामुळे फटका बसत असतो. छत्तीसगडमधील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने येथील इंद्रावती, पामुल गौतम, आणि पर्लकोटा ह्या नद्या सुद्धा ओसंडून वाहत आहेत. तिन्ही नद्यांवर पूर असल्याने भामरागड तालुका जलमय झाला आहे. मध्यरात्री अचानक पुराचे पाणी वाढल्याने स्थानिकांना काही उपायोजना करता आल्या नाही. यामुळे घरातील वस्तू, दुकानातील सामानाचे नुकसान झाले. येथे शंभराहून अधिक घरे पाण्याखाली सापडली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे.
वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
भंडारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. तसेच लगतच्या राज्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणे व जलाशय व नदीच्या जलस्तरात वेगाने वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे गेट रात्री उघडण्याची शक्‍यता असून वैनगंगेची पाणी पातळी वाढणार असल्याने काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तलाठ्यांना गावात दवंडी देण्याचे व ग्रामपंचायतला माहितीपत्रक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी (ता. 8) जोर पकडला. हवामान खात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. इरई धरण 94 टक्के भरले असून, पाच दरवाजेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना दक्ष राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गुरुवारी जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरू झाला. काहीवेळ रिमझिम बरणाऱ्या पावसाने दुपारी बारा वाजतानंतर जोर पकडला. दुपारपासून पाऊस सुरू आहे. शहराजवळील इरई धरणातील जलसाठा वाढत असून, पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाच गेट उघडण्यात आले.
गोंदियात रिमझिम
गोंदिया जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. सालेकसा तालुक्‍यातील पुजारीटोला धरणाची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे धरण नियंत्रणाकरिता येत्या चोवीस तासांत धरणाचे गेट केव्हाही उडघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बाघ नदीची पाण्याची पातळी वाढू शकते. परिणामी, मासेमारी, जनावरे धुणे आणि पोहोण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे.
कारंजा तालुक्‍यातील 10 गावे संपर्काबाहेर
कारंजा (जि. वर्धा) तालुक्‍यातील किन्हाळा-जसापूर मार्गावर पुलावरील नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नरसिंगपूर-माळेगाव रस्ता बंद झाला आहे. नारा तारासावंगा मार्गावरील सावहडोह गावानजिक नदीवरील पुलावर पाणी वाहत असल्याने 10 गावांचा संपर्क तुटला असून नागरिक अडकून पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com