
युवतीच्या मोबाईल क्रमांकावर दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून, बॅंक खात्याशी संबंधित आवश्यक असलेली जी माहिती विचारली जाईल, ती पूर्ण सांगावी, अशा शब्दात युवतीला बजावले.
अमरावती : कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून प्राप्त केलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका तोतयाने 1 लाख 28 हजार 481 रुपये खात्यातून दुसरीकडे वळवीत युवतीची फसवणूक केली आहे. श्रद्धा हरिचंद्र भाये, असे फसवणूक झालेल्या युवतीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीवरून मंगरुळचव्हाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या युवतीच्या मोबाईल क्रमांकावर दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून, बॅंक खात्याशी संबंधित आवश्यक असलेली जी माहिती विचारली जाईल, ती पूर्ण सांगावी, अशा शब्दात युवतीला बजावले. त्यानंतर युवतीनेही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवत बॅंकखात्याशी संबंधित सर्वच गोपनीय माहिती तोतया अधिकाऱ्याला सांगितली.
त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या नावाने असलेल्या नांदगावखंडेश्वर येथील बॅंकखात्यामधून पैसे विड्रॉल केल्याचे मॅसेज आले. त्यांनी बॅंकेतील रेकॉर्ड तपासले असता, त्यांच्या खात्यातून तब्बल सात वेळा 1 लाख 28 हजार 481 रुपये एवढी रक्कम कुणीतरी ऑनलाइन दुसरीकडे वळूवन, फसवणूक केल्याचे उघड झाले. अखेर त्या युवतीने मंगरुळ चव्हाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल झाला.
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये
कुणीही अधिकारी बॅंकखात्याची गोपनीय माहिती मोबाईलवर संपर्क साधून विचारत नाही. असे बहुतांश फोन तोतयांचे असतात, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये.
- वीरेंद्र चौबे, उपनिरीक्षक, ग्रामीण सायबर ठाणे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)