रनाळा येथे चिमुकलीचा गळा आवळून खून

file photo
file photo

कामठी (जि. नागपूर) : एक महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करण्यात आला. हे क्रौर्य येथेच थांबले नाही, तर तिचा मृतदेह गाई-म्हशीच्या पायाखाली तुडविण्यासाठी गोठ्यात फेकून दिला. ही हृदयद्रावक घटना कामठी तालुक्‍यातील रनाळा येथे बुधवारी (ता.18) मध्यरात्री सुमारे दोन वाजता घडली. आज, गुरुवारी सकाळी ती उघडकीस आली. पोलिसांनी बालिकेची आई व आजीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीचा मौदा तालुक्‍यातील अरोली गावातील मोलमजुरी करणाऱ्या अनिल उत्तम कनोजे यांच्या कुटुंबात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जन्म झाला होता. चिमुकलीच्या जन्माने कुटुंबात आनंद होता. मात्र, प्रकृती बरी नसल्याने तिला कामठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याचे कारण देऊन उपचारासाठी दिवसाला हजार रुपयांच्या वर खर्च येणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. हा खर्च न झेपताही कुटुंबीयांनी उपचार सुरूच ठेवला. काही दिवसांनी उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आठवड्यातील तीन दिवस कुटुंबीय उपचारासाठी अरोलीवरून कामठीला चिमुकलीसह येत होते.
बुधवारी (ता.18) दुपारी दोन वाजता चिमुकलीची आई पायल, वडील अनिल, काका सुनील व आजी पुस्तकला कनोजे कामठी येथे आले होते. तपासणीनंतर ते रनाळा येथील नातेवाईक करण मुरारी बर्वेकर यांच्याकडे मुक्कामी होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व झोपेत असताना आई पायल उठल्यावर तिला चिमुकली दिसली नाही. तिने शोधाशोध केली. त्यानंतर घटनेची माहिती त्वरित नवीन कामठी पोलिसांना दिली. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी शोध घेतला. संशयाच्या आधारे आई व आजीची कडक शब्दात चौकशी केली. यानंतर पायलने आजी पुस्तकला चिमुकलीला घेऊन ज्या मार्गाने गेली, त्या दिशेने सोबत नेले. रनाळा गावातील रंजित लोणारे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत पांडुरंग गणेर यांच्या गोठ्यातील एका खड्ड्यात चिमुकलीचा मृतदेह फेकल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचे रहस्य उलगडण्यासाठी तसेच घटनेतील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी मृत चिमुकलीची आई व आजीला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू आहे. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तसेच चौकशीअंती घटनेचे रहस्य उलगडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com