दर चाळीस सेकंदांत एक आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

यवतमाळ : आत्महत्येमुळे मृत होणाऱ्यांची संख्या ही युद्ध तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार वर्षाला दहा लाख व्यक्ती आत्महत्येमुळे जीव गमावतात. दर 40 सेकंदात एक जण याप्रमाणे दिवसाला तीन हजार आत्महत्या होतात, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी दिली.

यवतमाळ : आत्महत्येमुळे मृत होणाऱ्यांची संख्या ही युद्ध तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार वर्षाला दहा लाख व्यक्ती आत्महत्येमुळे जीव गमावतात. दर 40 सेकंदात एक जण याप्रमाणे दिवसाला तीन हजार आत्महत्या होतात, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी दिली.
आत्महत्या प्रतिबंधात्मक जनजागृतीसाठी "इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेंशन (आयएएसपी), डब्ल्यूएचओ आणि वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ' या संघटनांच्या वतीने दहा सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधदिन म्हणून जगभर पाळला जातो. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये साधारणत: 90 टक्‍के लोकांना मनोविकार असतो. वेळीच आणि योग्य मानसिक उपचार न मिळाल्याने असे मनोरुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतात. तीव्र नैराश्‍य, व्यसनाधिनता, सिझोफ्रेनिया, बायपोलार मूड डिसॉर्डर या विकारांनी ग्रासलेले रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करु शकतात. तसेच बॉर्डरलाईन पर्सनॅलीटी डिसॉर्डर व इतर व्यक्तिमत्व दोष, दीर्घकालीन शारीरिक आजार, पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न, आर्थिक नुकसान, शैक्षणिक नुकसान आदी कारणांमुळेही आत्महत्येचा विचार लोकांच्या मनात येवू शकतो.
आत्महत्येचा विचार तेव्हा येतो. हे दु:ख, यातना असह्य होते की नाही याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. आत्महत्येचा प्रयत्न कमकुवतपणाचे लक्षण नसून ती एक मदतीची हाक असते. आत्महत्येचे विचार आल्यास स्वत:ला सावरावे, स्वत:ला थोडा वेळ द्यावा कारण आत्महत्येचे विचार आणि कृती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फक्त तसा विचार आला म्हणून तो ताबडतोब कृतीत उतरवलाच पाहिजे, असे नसते. आपल्या विचारानंतर थोडावेळ थांबावे, कृती करण्याची घाई करू नये, असे आवाहन डॉ. मेश्राम यांनी केले. आपल्या जवळचा मित्र, नातेवाइक, डॉक्‍टर, समूपदेशकाशी चर्चा केल्यास प्रश्‍नाचे उत्तर हमखास मिळते. आत्महत्येचे विचार हे क्‍लेशकारक असतात. म्हणून तसे विचार आल्यास अथवा निघून गेल्यानंतरही आपण स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, योग्य वेळी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला व उपचार घेतले पाहिजे. आत्महत्येचे विचार मनात येऊ नयेत यासाठी सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करणे गरजेचे आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी यापेक्षा वाईट घडले नाही हे बरे झाले असे समजून स्वत:ला आनंदात ठेवले पाहिजे. आनंदी जीवन हेच आत्महत्येपासून स्वत:ला दूर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.

काय म्हणतो, एनसीआरबी अहवाल
नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‌ ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार 2012 साली देशात एक लाख 35 हजाराहून अधिक तर महाराष्ट्रात 16 हजार 112 लोकांनी आत्महत्या केली होती. तामिळनाडूनंतर आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. आत्महत्येचे प्रमाण हे 15-29 या वयोगटात सर्वात जास्त आहे.

काय आहेत कारणे
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार आत्महत्यांच्या कारणांमध्ये आजारपणाला कंटाळून 20.8 टक्‍के, कौटुंबिक समस्यांमुळे 25.6 टक्‍के, मादक पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे 3.3 टक्‍के, दिवाळखोरी किंवा अचानक आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे 2 टक्‍के, आत्यंतिक गरीबीमुळे 1.9 टक्‍के, हुंड्यासाठी छळ झाल्याने 1.6 टक्‍के, इतर कारणांनी 26.5 टक्‍के आत्महत्या झाल्या. तर, 15.1 टक्‍के आत्महत्यांची कारणे समजू शकली नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One suicide every forty seconds