ऑनलाइन सेवापुस्तिकेचा पॅटर्न राज्यभर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - शासकीय कर्मचारी म्हणून रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतची इत्थंभूत माहिती देणारी चोपडी म्हणजे ‘सेवापुस्तिका’. अनेक वर्षे हाताळल्याने या पुस्तिकेची अवस्था वाईट होते. नागपूर जिल्हा परिषदेने ही सेवापुस्तिका ऑनलाइन केली आहे. सेवापुस्तिका ऑनलाइन करणारी नागपूर जिल्हा परिषद राज्यात पहिली असून, याची दखल घेऊन शासनाने राज्यभर हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला.

शासकीय कर्मचारी सेवेत रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंत त्या कर्मचाऱ्याची सर्व माहिती सेवा पुस्तिकेत नोंदविली जाते. यात कर्मचाऱ्याच्या नियुक्तीची आणि सेवानिवृत्तीची तारीख, कोणत्या वर्गात नियुक्ती झाली, पगारवाढीची माहिती, कर्मचाऱ्याविरुद्ध झालेल्या चौकशी कारवाईची माहिती, त्याने घेतलेल्या सुट्यांची माहिती सेवापुस्तिकेत नोंदविली जाते. ही सेवा पुस्तिका अनेकदा जुनी आणि जीर्ण होते. परंतु, ती ऑनलाइन केल्यास समस्या सुटणार आहे. तसेच सेवापुस्तिका ऑनलाइन असल्याने त्यात खोडतोड करून बॅकडेट एन्ट्री करणे शक्‍य होणार नसल्याने कामाची पारदर्शकताही वाढणार आहे. ऑनलाइन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून एक सॉफ्टवेअरही तयार केले असून, यात सर्व कर्मचाऱ्यांची माहिती समाविष्ट केली आहे. याचा एक ॲपही तयार करण्यात येईल. या ॲपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरूनच सुटीचा अर्ज टाकता येईल.

आयडिअल काम
सेवापुस्तिका ऑनलाइन केल्याबद्दल ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशंसा केली. नागपूरचे काम आयडिअल असून, सर्व जिल्हा परिषदांच्या प्रमुखांना नागपूरशी संपर्क साधून सेवापुस्तिका ऑनलाइन करण्याच्या सूचना व्हीसीत दिल्या. यापूर्वी स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या मतदान आणि स्वच्छता उपक्रमाचाही त्यांच्याकडून गौरव करण्यात आला.

वर्ग तीन व चारच्या गटातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका ऑनलाइन करण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांची सेवा लवकरच ऑनलाइन करण्यात येईल. प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनात हे काम करण्यात आले. याचे श्रेय संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे आहे. 
- डॉ. कादंबरी बलकवडे, सीईओ

Web Title: online service book pattern