
- खरीप पिकांसाठी 8 हजार आणि फळबागांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर
अकोला : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार खरीप पिकांसाठी 8000 रुपये प्रति हेक्टर (अडीच एकर) आणि बारामाही पिकांसाठी 18 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. अवकाळी व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार 719.25 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनी जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 297 कोटीं 94 लाख 30 हजार रुपयांची मदत अपेक्षित आहे. परंतु मदतीच्या संदर्भात अद्याप स्पष्ट दिशानिर्देश अप्राप्त आहेत.
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे जिल्ह्यातील 3 लाख 9 हजार 341 शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसाकावला गेला. 3 लाख 69 हजार 719.25 हेक्टरवरील पिकं बाधित झाली. त्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी शासकीय मदतीची आस लावून बसले होते. परंतु राज्यात राष्ट्रपती राजवट असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (ता. 17) शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार खरीप पिकांसाठी 8000 रुपये प्रति हेक्टर (अडीच एकर) आणि बारामाही पिकांसाठी 18 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार 719.25 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 297 कोटीं 94 लाख 30 हजार रुपयांची मदत अपेक्षित आहे.
अशी मिळेल अपेक्षित मदत
- जिरायती क्षेत्र : जिल्ह्यातील 3 लाख 65 हजार 69.41 हेक्टरवरील जिरायती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले. सदर नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी 292 कोटीं 5 लाख 55 हजार 280 रुपयांची मदत अपेक्षित आहे. त्यामुळे 2 लाख 97 हजार 668 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.
- बागायती क्षेत्र : अतिवृष्टीमुळे 2 हजार 482.24 हेक्टरवरील बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी 1 कोटीं 98 लाख 57 हजार 920 रुपये मदत अपेक्षित आहे. त्यापासून 361 शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- फळबाग : फळबागांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील 232 शेतकऱ्यांना 3 कोटीं 90 लाख 16 हजार 800 रुपयांची मदत मिळेल. जिल्ह्यातील 2 हजार 167.60 हेक्टर बागायती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.