कुत्र्यानेच केली अंधश्रद्धेची पोलखोल

वरुड : लाल पाण्याने भरलेल्या बाटलीशी खेळत असताना कुत्री.
वरुड : लाल पाण्याने भरलेल्या बाटलीशी खेळत असताना कुत्री.

वरुड (अमरावती): गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कुंकवाच्या पाण्याची लाल रंगाची बाटली भरून लोक आपापल्या प्रतिष्ठानांसह घरासमोर टांगून अथवा भिंतीला लावून ठेवत असल्याचे चित्र होते. ही अंधश्रद्धा वरुड शहरात दाखल झाली होती. मात्र कुत्र्यांनी या बाटलीशी खेळ करून अंधश्रद्धाळू जनतेला चपराक दिली आहे. 
या लाल रंगाच्या बाटलीसंदर्भात बऱ्याचदा नागरिकांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, ही कुंकवाच्या पाण्याची बाटली भरून किंवा टांगून ठेवली तर कोणताही प्राणी अथवा विशेषतः कुत्रा आपले मल, मूत्र त्याठिकाणी विसर्जित करीत नाही. त्यामुळे या लाल रंगांच्या बाटल्या आम्ही लावून ठेवल्या आहेत. साहजिकच एकाने आपल्या दुकानासमोर बाटली लावली तर कुत्रा दुसऱ्याच ठिकाणी आपले मलमूत्र टाकणार आणि याच भीतीपोटी दुसराही आपल्या दुकानासमोर बाटली लावत असे. त्यामुळे या लाल बाटलीचे लोण हळूहळू सर्व महाराष्ट्रात पोहोचले. प्रत्येक जण आवर्जून आपापल्या प्रतिष्ठानासमोर कोणताही शास्त्रीय आधाराचा विचार न करता अंधश्रद्धेने बाटली लावू लागला आणि अख्खा महाराष्ट्र लाल करून टाकला.
आज शहरातील सती चौक परिसरात तीन कुत्र्यांनी या लाल बाटलीच्या खेळाचा खुलेआमपणे पर्दाफाश केला. अख्खी लाल बाटली तोंडात धरून त्यांनी या अंधश्रद्धेची पोलखोल केली. कुत्रे आपल्याला काहीतरी वेगळे खेळणे मिळाले आहे, या आविर्भावात मस्तपैकी त्या बाटलीला एकमेकांच्या तोंडून हिसकवण्याचा प्रयत्न करीत होते. ते केवळ या लाल बाटलीचाच खेळ खेळत नव्हते तर मानवाने अंधश्रद्धेने पोसलेल्या मानसिकतेचे धिंडवडेसुद्धा काढीत होते. या तीन कुत्र्यांनी आपल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या डोक्‍यात झणझणीत अंजन घालण्यास मदत केली.एकीकडे चंद्रयानाच्या माध्यमातून चंद्राला गवसणी घालणारा हा मानव उद्या मंगळावर वस्ती करू पाहतो आणि दुसरीकडे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची स्थिती आहे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com