बळीराजावर आणखी एक संकट! लाखोंपैकी अवघ्या साडेनऊ हजार जणांनाच पिकविम्याचा लाभ

only few farmers get benefit of crop insurance in yavatmal
only few farmers get benefit of crop insurance in yavatmal

यवतमाळ : शेतकऱ्यांचा पाठलाग अजूनही संकटांनी सोडलेला नाही. एका मागून एक संकट शेतकऱ्यांवर येतच आहे. अनेक संकटांचा मुकाबला केल्यानंतर पीकविम्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा उतरविला होता. त्यातील केवळ साडेनऊ हजार शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला असून, सव्वाचार लाख शेतकरी निकषाच्या कचाट्यात अडकले आहेत.

जिल्ह्यात यंदा जवळपास साडेनऊ लाख हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र, निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी देशोधडीला पोहोचला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा खरीप, रब्बी हंगाम वाया जातो. त्यामुळे शासनाने पिकांना संरक्षण देण्याच्यादृष्टीने चार लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. त्यादृष्टीने यंदा जिल्ह्यातील चार लाख 61 हजारांवर शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. 

त्यात सोयाबीन पिकासाठी एक लाख 97 हजार 252 व कापूस पिकासाठी एक लाख सहा हजार 591 शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. सुरुवातीला पडलेला अनियमित पाऊस व त्यानंतर आलेल्या सततच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाची बोंडे पूर्णतः काळवंडली, तर उरलेल्या कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. परतीच्या पावसाने सोयाबीनची हानी झाली. 

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. मात्र, कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे समाधान शेतकऱ्यांचे करण्यात आले नाही. शेवटी पीकविम्याचा लाभ मिळेल, या आशेत शेतकरी होते. परंतु, विमा कंपन्यांनी चलाखी केली. या चलाखीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. 

आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ नऊ हजार 547 शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला आहे. त्यात सर्वांधिक तीन हजार 955 शेतकरी उमरखेड तालुक्‍यातील आहेत. शेतकऱ्यांना सात कोटी 18 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत. परंतु, उर्वरित शेतकऱ्यांची निराशा झाली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपन्यांविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता केली जात आहे.

तालुकानिहाय लाभार्थींची संख्या

आर्णी 330, बाभूळगाव 323, दारव्हा 674, दिग्रस 309, घाटंजी 669, कळंब 172, केळापूर 378, महागाव 1,117, मारेगाव 35, नेर 343, पुसद 1,114, राळेगाव 17, उमरखेड 3,955, वणी 15, यवतमाळ 175,
झरी जामणी 21.

नेत्यांकडून लढाईची अपेक्षा

जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणारे स्वयंम घोषित शेतकरी नेत्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमालीची वाढली आहे. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मोठे आंदोलन झाले नाही. सत्ताधारी व विरोधकांकडून आश्‍वासने दिली जातात. मात्र, ती पूर्ण करण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पीकविम्याच्यादृष्टीने शासन व प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम कुणाकडूनही केले जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

संपादन -  अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com