13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकाऱ्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार असल्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला असून मुख्याधिकार्‍यांची न.प.तील अनुपस्थिती त्रासदायक बनली आहे.

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त प्रभार असल्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला असून मुख्याधिकार्‍यांची न.प.तील अनुपस्थिती त्रासदायक बनली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात 11 नगर परिषद व 2 नगर पंचायती आहेत. यातील बहुसंख्य नगर पालिकांचा विस्तीर्ण कारभार आहे. न.प.ची दैनंदिन कामे, न.प.तर्फे पुरविण्यात येणार्‍या नागरी सेवा-सुविधा, सातत्याने होणारी विकासात्मक कामे, राबविण्यात येणारे विविध अभियान हे बघता नगर पालीकांना कायमस्वरुपी मुख्याधिकारी असणे अत्यंत आवश्यक असते. मुख्याधिकार्‍यांकडे न.प.ची महत्वपूर्ण प्रशासकीय जबाबदारी असते. मुख्याधिकार्‍यांविना न.प.ची दैनंदिन तसेच महत्वपूर्ण कामे होवू शकत नाही. त्यामुळे न.प.मध्ये मुख्याधिकार्‍यांचे पद महत्वाचे आहे.

मात्र जिल्ह्यातील चारच न.प.मध्ये कायमस्वरुपी मुख्याधिकारी आहेत. इतर नऊ पालीकांचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरु आहे. जे चार मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे स्वत:च्या पालीकेबरोबर इतर पालीकांचा अतिरिक्त प्रभार आहे.  त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. न.प.मधील मुख्याधिकार्‍यांची अनुपस्थिती हा सध्या कळीचा विषय बनला आहे. परिणामी पालीकांची महत्वपूर्ण कामे रखडली असून याचा नगरसेवकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नांदुरा न.प. मध्ये 4 जानेवारीपासून या न.प. ला मुख्याधिकारी नाहीत. नगराध्यक्षा सौ.रजनी जवरे यांनी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्याकडे खामगावसह शेगाव पालीकेचा अतिरिक्त प्रभार आहे. तसेच त्यांच्याकडे काही दिवसापुर्वी डी.पी.ओ.(डिस्ट्रीक प्लॅनिंग ऑफीसर)चा ही प्रभार होता. यामुळे मुख्याधिकारी बोरीकर हे खामगाव न.प.त पुर्ण वेळ देवू शकत नाही.  इतरही ठिकाणी हीच परिस्थिती आहे.

कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने पालीकेच्या कामकाजाचा खोळंबा होत  आहे.नागरिकांना त्रास होतो. विकासकामांना खीळ बसली आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका मध्ये हीच परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन नगर पालिकामध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावेत.
- सतिषआप्पा दुडे, नगरसेवक खामगाव

असा आहे पदभार
अभिजीत वायकोस यांच्याकडे चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, मलकापूर पालिका, महेश वाघमोडे यांच्याकडे बुलडाणा, लोणार व नांदुरा, धनंजय बोरीकर यांच्याकडे खामगाव  व शेगाव, आशिष बोबडे यांचेकडे जळगाव जामोद, संग्रामपूर व मोताळा तर नायब तहसिलदार  एस.डी.वीर यांच्याकडे सिंदखेडराजा पालिकेचा कारभार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only the four chief officers control over the administration of 13 municipal corporation