आता उरणार केवळ चित्रपटांच्या "स्मृती'!

File photo
File photo

आता उरणार केवळ चित्रपटांच्या "स्मृती'!
नागपूर : काही चित्रपट त्यांच्या दर्जामुळे हीट होतात, तर काही चित्रपटगृहांच्या ताकदीवर. चित्रपटगृहांची ही ताकद मध्यमवर्गीयांच्या भरवशावर वाढत असते. नागपुरातील "मध्यमवर्गीयांचे मल्टिप्लेक्‍स' म्हणून ओळख असलेल्या स्मृती सिनेमागृहाने 33 वर्षांत अनेक "माईलस्टोन' गाठले. मात्र, आता या वास्तूच्या केवळ "स्मृती' कायम असणार आहेत.
सदर भागात डौलदार उभी असलेली स्मृती चित्रपटगृहाची इमारत तशी मल्टिप्लेक्‍सपेक्षा कमी नाहीच. नागपुरातील सिंगल स्क्रिन सिनेमागृहांमध्ये सर्वांत भव्य असे हे एकमेव सिनेमागृह आहे, यात दुमत नाही. 1985 साली "मर्द' चित्रपटाच्या प्रदर्शनाने सुरू झालेल्या स्मृतीची एक्‍झिट मात्र इतर सिनेमागृहांच्या तुलनेत वेगळी होतेय. आर्थिकदृष्ट्या डबघाईस लागणे, प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळणे, नवे चित्रपट प्रदर्शित न होणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणे यापैकी कुठलेही कारण स्मृतीच्या बंद होण्यामागे नाहीत. उलट या सर्व पातळ्यांवर स्मृतीने स्वतःला सिद्ध केले आणि टिकवून ठेवले. पण, लीज संपत असल्यामुळे येत्या 30 ऑगस्टला रात्री 9 ते 12 हा या चित्रपटगृहातील अखेरचा शो असेल. अर्थात व्यवस्थापनाने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही 31 ऑगस्टपासून स्मृती सिनेमागृह नागपूरकर प्रेक्षकांच्या सेवेत नसेल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले आहे. सध्या "गोल्ड'चे शो सुरू असून "हॅपी फिर भाग जाएगी' हा या चित्रपटगृहातील अखेरचा सिनेमा असेल, अशी शक्‍यता आहे. परिणामी स्मृतीमधील तीस कर्मचाऱ्यांच्या पोटाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.
आणखी दोन चित्रपटगृहांना ताळे?
चित्रा, अमरदीप, भरत, नटराज, रिगल, नरसिंग, रिजंट यासह नऊ चित्रपटगृहे गेल्या दोन दशकांमध्ये बंद पडली आहेत. तर आणखी दोन चित्रपटगृहांना ताळे लागण्याची चिन्हे आहेत. या यादीत स्मृती सिनेमागृहाची भर पडणे ही नागपूरच्या करमणूक क्षेत्रातील सर्वांत दुर्दैवी घटना ठरणार आहे.
मनमोहन देसाईंच्या हस्ते उद्‌घाटन
1985 साली "मर्द'चे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या हस्ते सिनेमागृहाचे उद्‌घाटन झाले होते. त्यानंतर अनेक जुन्या-नव्या पिढीतील कलावंतांनी स्मृतीला भेट दिली आहे. अझहरुद्दीनच्या नेतृत्वातील भारतीय संघानेही याठिकाणी सिनेमा बघितला आहे, अशी आठवण व्यवस्थापक सांगतात.


चित्रपटगृह बंद होणार याची घोषणा व्यवस्थापनाने केलेली नसली, तरी हे जवळपास निश्‍चित झाले आहे. याठिकाणी पुढे मल्टिप्लेक्‍स उभे होणार असल्याचे केवळ ऐकिवात आहे.
- संतोष मिश्रा, व्यवस्थापक, स्मृती सिनेमा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com