चिखलदऱ्याच्या १०८ रुग्णवाहिकेचा भार एकाच डॉक्‍टरवर; सांगा, कशी मिळणार रुग्णांना तातडीची सेवा

file photo
file photo

अचलपूर (जि अमरावती) : महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून नावारूपास आलेली १०८ रुग्णवाहिकेची सेवा केवळ डॉक्‍टरअभावी कुचकामी ठरत आहे. चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकक्षेत ही सेवा दिली जात आहे. मात्र या १०८ रुग्णवाहिकेवर एकच डॉक्‍टर असल्याने तातडीचे उपचार व रुग्ण संदर्भसेवेला ब्रेक लागला आहे.

याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे, अन्यथा तातडीच्या आरोग्यसेवेअभावी रुग्ण दगावण्याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णवाहिकासोबतच डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

चिखलदरा एकच रुग्णवाहिका

महाराष्ट्र शासनाने आपात्कालीन स्थितीसाठी सुरू केलेली १०८ रुग्णवाहिका ही अत्यावश्‍यक उपचार किंवा संदर्भसेवेसाठी वरदान ठरलेली आहे. मेळघाटसाठी आपात्कालीन परिस्थितीत १०८ चा मोठा आधार आहे. सध्या जिल्ह्यात २९ रुग्णवाहिका असून त्यावर ५३ डॉक्‍टर कार्यरत आहेत. परंतु चिखलदरा येथील रुग्णसेवेकरिता एकच डॉक्‍टर असल्याने तत्काळ सेवा मिळण्यास अडचण येत आहे. परिणामी रुग्णांना त्याची मोठी झळ सोसावी लागत आहे.

खासगी कंपनीचे नियंत्रण

१०८ वर खासगी कंपनीचे नियंत्रण आहे. या कंपनीकडून डॉक्‍टरांच्या नियुक्तीबाबत दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील पद रिक्त आहे. त्याचा परिणाम रुग्णांना वेळेवर सेवा उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

रुग्णांन वेळेवर उपचार मिळत नाही

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखाली रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा १०८ च्या माध्यमातून पुरविली जाते. त्यानुसार आरोग्यसेवेपर्यंत रुग्णांना सुखरूप पोहोचविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची मदत होत असते. रस्ते अपघातातील जखमी, सर्व गंभीर आजारांचे रुग्ण, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशू संबंधातील आजार, साथीचे रोग, हृदयरोग, श्‍वसनरोग, मेंदूचे आजार या सर्व आजारांवर १०८ ही आपात्कालीन परिस्थितीत मोलाचा हातभार लावत असल्याने रुग्णांचे प्राण वाचत आहेत. परंतु आता या सेवेला चिखलदऱ्यात डॉक्‍टरअभावी ब्रेक लागल्याने रुग्णांना वेळेवर उपचार व संदर्भसेवेसाठी पदरमोड करून बरीच यातायात करावी लागत आहे.

डॉक्‍टरांची नियुक्ती लवकरच

चिखलदरा येथील १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्‍टर मिळण्यास अडचण जात आहे. तरीसुद्धा सध्या कार्यरत असलेल्या डॉक्‍टरला विश्रांती मिळावी म्हणून दोन दिवस सुटी देण्यात येते. त्यांच्याऐवजी दोन दिवस दुसरे डॉक्‍टर सेवा देतात. लवकरच डॉक्‍टरची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती १०८ जिल्हा व्यवस्थापक डॉ. अब्रूक यांनी दिली.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com