सख्ख्या भावांचा खून करणारे नातेवाईकच

file photo
file photo

बेला/उमरेड (जि.नागपूर ): तालुक्‍यातील बेल्लापार जंगलात आढळून आलेल्या दोन सख्ख्या भावांच्या खुनातील तीन आरोपींना बेला पोलिसांनी सिर्सी येथून अटक केली आहे. तिन्ही आरोपी हे मृतांचे नातेवाईक असून 25 वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी दोन्ही भावंडांचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
संतोषसिंग (वय 24) व संगतसिंग अवतारसिंग तिलपितिया (वय 22, दोघेही रा. महालगाव, ता. भिवापूर) या दोन सख्ख्या भावंडाचा खून करून बेल्लापार जंगलातील एका नाल्यात फेकून दिल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी जयसिंग बलवीरसिंग तिलपितीया (वय 42), ओंकारसिंग उर्फ दशरथ तिलपितिया (वय 27, रा. महालगाव, ता. भिवापूर) व मिटू ऊर्फ विकी मोहन धाडसे (वय 19, रा. सिर्सी) यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 28 जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृत दोन्ही भावंडे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्याची तक्रार बेला पोलिसांत देण्यात आली होती. याशिवाय त्यांचे कुटुंबीय दोघांचाही शोध घेत होते. सोमवारी सकाळी बेल्लापार जंगलात दोन्ही मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी सहा तासांत या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. मृताचा भाऊ व फिर्यादी गुरमुखसिंग यांनी दिलेल्या तक्रारीत, 25 वर्षांपूर्वी आरोपी जयसिंग याच्या वडिलाने गुरुमुखसिंगच्या आजीला शेतात जबर मारहाण केली होती, तेव्हापासून दोन्ही कुटुंबांत वाद सुरू होता. नेहमीच वाद व भांडणे व्हायची. 16 जुलै रोजी संतोषसिंग व संगतसिंग दोघेही बेल्लापारच्या जंगलाकडील शेतात गेले होते. परत येत असताना निर्जनस्थळी त्यांच्या मागावर असलेल्या तिन्ही आरोपींनी कुऱ्हाड व दगडाने ठेचून खून केला. यानंतर त्यांचे मृतदेह नाल्यात फांद्यांनी झाकून ठेवले. दुसरीकडे पोलिसांना या खून प्रकरणात आणखी काही पैलू असावे असाही संशय आहे. पुढील तपास बेलाचे ठाणेदार शिवाजीराव भांडवलकर करीत आहेत. मंगळवारी शवविच्छेदनानंतर दोन्ही भावंडांवर महालगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
व्यावसायिक वैमनस्याचा संशय
मृत संतोषसिंग व संगतसिंग हे शिकलकार समाजाचे असल्याने त्यांचा मुख्य व्यवसाय धारदार शस्त्रे व वस्तू विकण्याचा होता. त्यांची शेतीही होती. याशिवाय त्यांचे आणखी काही व्यवसाय होते काय, याचाही तपास पोलिस घेत आहेत. कुटुंबातील वाद व व्यावसायिक वैमनस्य असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

मृत हे आरोपींचे नातेवाईक व अविवाहित होते. या खुनामागे आपसी वैमनस्यासह आणखीही काही कारणे असू शकतात. पोलिसांची तपासावर व अन्य घटनांवर बारकाईने नजर आहे.
- रवींद्र चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी, बुटीबोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com