‘ऑनस्क्रीन’ ते ‘ऑनलाइन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

पुणे, मुंबई आणि देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठ बरेच मागे असल्याचे बोलले जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. सर्व ‘ऑनलाइन’या उद्देशाने परीक्षांच्या मूल्यांकनापासून तर परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत  यश मिळविले. विद्यापीठाने परीक्षा विभागामध्ये ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकन आणि पेपरची ‘ऑनलाइन डिलिव्हरी’सारख्या नव्या योजनांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली आहे. 

नागपुरात आयआयएम आणि ट्रिपल आयटीसारख्या संस्थांची पायाभरणी होत असताना, त्याअनुषंगाने विद्यापीठाने आपले रूप बदलण्यास सुरुवात केली. याचाच पहिला टप्पा ‘आयटी रिफॉर्म’चा होता. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये आमूलाग्र  बदल करण्याचा संकल्प विद्यापीठ प्रशासनाने सोडला. त्यातूनच ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकनास सुरुवात झाली. अडीचशे संगणक आणि दीडशे स्कॅनरचा समावेश असलेली अत्याधुनिक ‘लॅब’ विद्यापीठाने सुरू केली. राज्यात आतापर्यंत कुठल्याच विद्यापीठात मूल्यांकनासाठी अशाप्रकारची प्रयोगशाळा नाही, हे विशेष. त्यातूनच झटपट निकाल देण्यात विद्यापीठ राज्यात प्रथम ठरले. यासोबतच ऑनलाइन नोंदणी, प्रवेशपत्र देणे आणि परीक्षा केंद्रांवर पेपरची ‘ऑनलाइन डिलिव्हरी’ या विद्यापीठाला यश आले.

आता जवळपास ९५० परीक्षांचे पेपर केंद्रांवर ‘ऑनलाइन’  पाठविण्यात येतात. केवळ निकालच नव्हे पीएच.डी.च्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी पीएच.डी. च्या नियमात बदल करून विद्यार्थ्यांना सोय व्हावी यासाठी मार्गदर्शकाची उपलब्धता याची माहिती मिळावी यासाठी ‘ॲप’तयार करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी  ‘ई-पेमेंट’ सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘येस’ या राष्ट्रीयीकृत बॅंकेशी विद्यापीठाने करार केला. येत्या उन्हाळी परीक्षेपासून विद्यार्थ्यांना थेट स्वत:चे परीक्षा शुल्कही भरता येणार आहे. ‘येस’ आणि ‘एचडीएफसी’ या दोन बॅंकांकडे ‘ई-पेमेंट’संदर्भात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने विद्यापीठाने दोन दिवसांपूर्वीच्या व्यवस्थापन परिषदेत मान्यता देत, ‘येस’बॅंकेशी सामंजस्य करार केला.येत्या उन्हाळी परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना ‘ई-पेमेंट’ सुविधेने भरता येणार आहे. या सुविधेमुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांचाही वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल. याशिवाय ‘स्किल डेव्हलपमेंट सेल’ची सुरुवात करून टीसीएस कंपनीमार्फत विद्यापीठाद्वारे बऱ्याच प्रमाणात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिल्या जात आहे. याशिवाय उद्योगांशी सामंजस्य करार करून त्याद्वारे युवकांना थेट रोजगार मिळावा यासाठी ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठात होणाऱ्या संशोधनातून अधिकाधिक पेटंट मिळावे यासाठी ‘पेटंट सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या इतर विद्यापीठांच्या तुलनेत विद्यापीठ आता कुठेही मागे नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: onscreen to online