अरेरे! रुग्णवाहिकेची वाट पाहत चिमुकलीने सोडले प्राण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

चंद्रपूरला जाण्यासाठी मोतीराम मडावी यांनी रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा दीड तास उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. मडावी कुटुंबीयांची परिस्थिती बेताची असल्याने पैसे देऊन बाहेरच्या वाहनाने चंद्रपूरला जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मडावी कुटुंब रियाला घेऊन वाट पाहत होते. रुग्णवाहिका तीन वाजता आली. तोपर्यंत रियाने अखेरचा श्‍वास घेतला होता.

राजुरा (जि. चंद्रपूर) : 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची वाट बघताबघता एका चिमुकलीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी चिमुकलीचे नाव रिया मोतीराम मडावी (वय अडीच वर्षे) आहे. 

जिवती तालुक्‍यातील टिटवी येथे राहणाऱ्या रिया मडावी हिची प्रकृती काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यामुळे रियाला तिच्या वडिलांनी आज, बुधवारी सकाळी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी रियाची तपासणी केली. त्यानंतर तिला राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथे सकाळ पाळीत असलेल्या डॉ. स्नेहल डाहुले यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे सकाळी 11 वाजता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

चंद्रपूरला जाण्यासाठी मोतीराम मडावी यांनी रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा दीड तास उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. मडावी कुटुंबीयांची परिस्थिती बेताची असल्याने पैसे देऊन बाहेरच्या वाहनाने चंद्रपूरला जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे मडावी कुटुंब रियाला घेऊन वाट पाहत होते. रुग्णवाहिका तीन वाजता आली. तोपर्यंत रियाने अखेरचा श्‍वास घेतला होता.

रियाच्या मृत्यूनंतर पालकांनी सेवेवर असलेले डॉक्‍टर व नर्स यांच्यावर रोष व्यक्त केला. राजुरा पोलिस ठाण्यात डॉक्‍टर कुलमेथे व सेवेवर असलेल्या पारिचारिका माधुरी बोरकुटे आणि प्रियांका रघताठे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oops! Waiting for the ambulance, Baby leaves her life