खुल्या वर्गातील डॉक्‍टर नैराश्‍यात

Doctor
Doctor

नागपूर - चार वर्षे जिवाचे रान केल्यानंतर एमबीबीएस झालो. ‘एमडी’ला (वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी) प्रवेश मिळविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहोत. ५० टक्के आरक्षणामध्ये पुन्हा मराठ्यांसाठी १६ टक्के व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ७८ टक्के जागा आरक्षणात जाणार असून, एमडीच्या १२ ते १५ टक्के जागा खुल्या वर्गासाठी आहे. यामुळे डॉक्‍टरांवरच नैराश्‍यात जाण्याची वेळ आल्याची भावना एमबीबीएस होऊन एमडीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या डॉक्‍टरांनी व्यक्‍त केली.

जगभरात कुठेच एमबीबीएस पदवीला किंमत उरलेली नाही. ‘नीट’च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत अव्वल आल्यानंतरच एमडीला प्रवेश मिळणार आहे. मात्र, सरकारने गुणवत्तेची हत्या करीत आरक्षणाचा टक्का वाढवल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘क्‍लिनिकल’ शाखांमधील अनेक विभागात खुल्या वर्गातील एमबीबीएसधारकांना प्रवेशच मिळणार नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. याचा निषेध म्हणून मंगळवारी मेडिकलच्या ट्रॉमा केअर युनिटसमोर विद्यार्थ्यांनी काळ्या फिती बांधून प्रतीकात्मक आंदोलन केले. 

सध्या एमबीबीएस पदवीच्या राज्यात सुमारे ३ हजार ९१३ जागा आहेत. यातील खुल्या वर्गासाठी २,२०४ जागा आहेत. एमडीच्या ९७२ तर खुल्या वर्गासाठी केवळ २२१ जागा राहतील. यामुळे खुल्या वर्गातील पदवीधारकांमध्ये प्रचंड असंतोष भडकला आहे.

राजकीय लाभासाठी आरक्षणात वाढ
सरकारने राजकीय हितासाठी आरक्षणाचा टक्का वाढवला आहे. मात्र, याचा फटका खुल्या वर्गातील एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता आरक्षणाला विरोध नाही. परंतु, सरकारने जो मागेल त्याला आरक्षण देण्याचे धोरण सुरू केल्याने खुल्या वर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे या व्यवसायात प्रवेश घेण्याचे दरवाजे बंद होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडीच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com