इंजिनिअरिंगच्या डिग्रीची खुलेआम विक्री

Crime
Crime

नागपूर - कडबी चौकातील क्‍लार्क टाउन परिसरात सुरू असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कार्यालयातून इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्‍निकची डिग्री विकण्याचा गोरखधंदा सुरू होता. या कार्यालयावर ठाणे येथील क्राइम ब्रॅंचने छापा घातला. या छाप्यात महत्त्वपूर्ण दस्तावेज पोलिसांनी जप्त करीत दोघांना अटक केली. ही कारवाई आज मंगळवारी दुपारी करण्यात आली. या प्रकारामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील बहुचर्चित कोहचाडे प्रकरणाला उजाळा मिळाला. मोहम्मद अजहर मोहम्मद इस्माइल अन्सारी (२७, मोमिनपुरा) आणि पायल सिंगुरवार (२५, रा. छावनी, सदर) अशी आरोपींची नावे आहेत. 
इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कार्यालय नईम नावाचा एक अभियंता तरुण चालवीत होता. पायल येथे मॅनेजर म्हणून नोकरीवर होती. तिला मुलांनी दिलेल्या पैशातून काही प्रमाणात टक्‍केवारीसुद्धा मिळत होती. मो. अजहर हा ॲडमिन म्हणून नोकरीवर होता. 

इंजिनिअरिंगच्या डिग्रीची खुलेआम विक्री
त्याच्याकडे सर्व पैशाचा व्यवहार होता. या इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअर आणि पॉलिटेक्‍निकच्या बनावट डिग्री मिळतात, अशी माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. क्राइम ब्रॅंचचे पोलिस उपनिरीक्षक ठाकरे यांनी आज मंगळवारी सकाळी या इन्स्टिट्यूटमध्ये छापा घातला. या छाप्यात २००८ पासूनचे शैक्षणिक दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले. तसेच हुबेहूब डिग्री तयार करण्याचे सॉफ्टवेअर आणि हार्डडिस्कही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. ठाणे पोलिसांना जरीपटका पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी मदत केली. 

विद्यार्थ्याने दिली टीप
ठाणे येथील एका विद्यार्थ्याला निमशासकीय विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून ‘सेटिंग’ करून नोकरी मिळवायची होती. त्याने नागपुरातील याच इन्स्टिट्यूटमध्ये पैसे देऊन इंजिनिअरिंगची बोगस डिग्री मिळवली. त्या डिग्रीच्या बळावर त्याने नोकरीही मिळवली. त्याने नातेवाईक असलेल्या एकाला नागपूरला पाठवले. परंतु, त्याचे पैसे घेतल्यानंतरही डिग्री न दिल्यामुळे त्याने ठाणे पोलिसांना टिप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एक ते दीड लाखात बना इंजिनिअर?
इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रतिरूप म्हणून या कार्यालयातून काम सुरू होते. केवळ १ ते दीड लाखात अभियांत्रिकीची डिग्री विक्री करण्याचा गोरखधंदा जवळपास २००८ पासून सुरू होता. या कार्यालयातून बाहेर निघालेले शेकडो इंजिनिअर वेगवेगळ्या कंपन्या तसेच शासकीय विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे या कार्यालयातून वर्षातून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com