पहिल्या पावसामध्येच मनपाचे पितळ उघडे

लक्ष्मीनगर ः आज जेमतेम पडलेल्या पावसाच्या सरीने रस्त्यांवर साचलेले पाणी. ड्रेनेज लाइन तुंबल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले.
लक्ष्मीनगर ः आज जेमतेम पडलेल्या पावसाच्या सरीने रस्त्यांवर साचलेले पाणी. ड्रेनेज लाइन तुंबल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले.

नागपूर : नदी, नाला स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलेल्या महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पावसाच्या केवळ एका सरीमध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यांवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तयारीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
शहरातील तिन्ही नद्यांचे 48 किमी पात्र स्वच्छ केले असून, अडीचशेवर नाले स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे मात्र अद्यापही जैसे थे आहेत. पालकमंत्री, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी अनेकदा बैठक घेऊन शहरातील रस्ते बुजविण्याचे निर्देश दिले. परंतु, आज व काल, शनिवारी झालेल्या पावसाच्या एका सरीतच दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील ऑरेंज सिटी स्ट्रिटवर पाणी साचल्याचे दिसून आले. पूर्व नागपुरातील पारडी परिसरातील रस्त्यांवरही पाणी साचले. दक्षिण नागपुरात बेसा रोड, बेलतरोडी रोड, दिघोरीतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले. केवळ एका सरीत रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्याने दुचाकी, कारचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. रेडीसन ब्लू चौकात ऑरेंज सिटी स्ट्रिटवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यातून पालकमंत्री, महापौर, स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश प्रशासनाने गुंडाळून ठेवल्याचे दिसून येत आहे. अशीच स्थिती शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम असून जलवाहिनी, वीजवाहिनी, फायबर केबलसाठी करण्यात आलेल्या खोदकामाचेही पुनर्भरण झाले नसल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्त्यांसह विविध वस्त्यांतील रस्त्याचीही स्थितीही गंभीर आहे. अद्यापही रस्त्याच्या बाजूच्या पावसाळ्या नाल्या तुंबल्या असल्याने केवळ एका सरीत रस्त्यांवर पाणी जमा झाले. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com