नायलॉन मांजाची खुलेआम विक्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नागपूर - पतंग उडविण्यासाठी शहरात प्राणघातक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पतंगविक्रेते नायलॉन मांजा विकत आहेत तर काही ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादानेच मांजाविक्री होत आहे. 

नागपूर - पतंग उडविण्यासाठी शहरात प्राणघातक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पतंगविक्रेते नायलॉन मांजा विकत आहेत तर काही ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादानेच मांजाविक्री होत आहे. 

मकरसंक्रांतीच्या महिनाभरापूर्वी शहरात पतंगबाजी सुरू होते. त्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा सर्रास वापरला जातो. पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी सर्वच पोलिस निरीक्षकांना नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शहरात अनेक ठिकाणी त्यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. प्राणघातक नायलॉन मांजामुळे शहरात अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. तर वाहनचालकांच्या गळ्याला मांजा गुंडाळल्याने अपघातही घडलेत. मात्र, पतंग उडविणाऱ्यांच्या हौसेपायी तसेच मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे अनेक दुकानदार नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवतात. यात काही पोलिस कर्मचारी कारवाईचा धाक दाखवून चिरीमिरी घेत आहेत. तर काही विशेष पथकांची दुकानदारांशी "सेटिग' असल्याने ठाण्यातील पोलिस कर्मचारी त्या दुकानाकडे दुर्लक्ष करतात. काही दुकानदारांनी दहा दुकानदारांचा गट बनवून डायरेक्‍ट "साहेबांशी' बोलणी करून ठेवली आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा भरपूर साठा असल्यानंतरही कारवाई करण्याची कुणाची हिंमत होत नाही. 

मांजाचे दाम दुप्पट 
मांजा विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा मागितल्यास सुरुवातीला नकार देतात. मात्र, हळूच त्याला सातशे रुपयांचे एक बंडल सांगून दुकानाच्या मागच्या बाजूला नेतात. त्यामुळे दुकानाच्या दर्शनीय भागात साधा मांजा तर दुकानाच्या स्टोअर रूममध्ये नायलॉन मांजाचा साठा असतो. त्यामुळे प्रतिबंधित मांजा कुठे चोरून तर कुठे खुलेआम विकला जात आहे. 

काही ठिकाणी "कारवाई'? 
काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत 100 पेक्षा जास्त पतंग विक्रेते असल्यानंतर केवळ दोन ते तीन दुकानदारांवर कारवाई करून पोलिस अधिकारी आपली पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, बड्या दुकानदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे "छुटपूट' कारवाई करण्यापेक्षा बड्या दुकानदारांचे आव्हान पोलिसांना आहे.

Web Title: Openly selling of nylon Manja