नोटाबंदीवरून विरोधकांचा गोंधळ

नोटाबंदीवरून विरोधकांचा गोंधळ

नागपूर - काळा पैसा रोखणे व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णयाला पाठिंबा देत अंमलबजाणीतील ढिसाळ नियोजन, त्यामुळे शेतकरी, सामान्य जनतेला गेल्या महिनाभरापासून होत असलेला त्रास यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात केला. दोन्ही सभागृहांत चर्चेची मागणी फेटाळून लावल्याने संतप्त विरोधकांनी गोंधळ घालत वादळी अधिवेशनाचे संकेत दिले. विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला, तर विधान परिषदेत गोंधळामुळे कामकाज स्थगित करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरवातीलाच आपल्या भाषणातून भ्रष्टाचार व काळा पैसा रोखण्यासाठी नोटाबंदीला समर्थन असल्याचे नमूद करीत नोटाबंदीनंतर होणाऱ्या परिणामांचा जराही विचार करण्यात आला नसल्याची टीका केली. जिल्हा बॅंकेत नोटा घेतल्या जात नाही, काढताही येत नाही. शेतकऱ्यांचे दुसऱ्या बॅंकेत खाते नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी, बियाण्यांसाठी पैसे घ्यायचे कुठून, असा प्रश्‍न करत या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, त्यांचा शेतमालाचे भाव पडल्याचे वास्तव त्यांनी मांडले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठा करणारी राज्य सहकारी, जिल्हा सहकारी बॅंक आणि सोसायटी ही थ्री टीयर सेवा कोलमडली. 50 दिवस कशाला कळ काढायची, असा प्रश्‍न अजित पवार यांनी उपस्थित केला. गणपतराव देशमुख यांनीही नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर ताशेरे ओढले. या वेळी चर्चेला तयारी असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले; परंतु स्थगनवर चर्चा नियमात नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. नोटाबंदीनंतर राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची जंत्रीच सांगत असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकापच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. गोंधळातच अध्यादेश, विधेयक पटलावर मांडण्यात आले. विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व कॉंग्रेसचे नारायण राणे यांनी सरकारला धारेवर धरले. शेकापचे जयंत पाटील यांनीही सरकारला धारेवार धरले. त्याच वेळी मुनगंटीवर यांच्या टोलेबाजीने विरोधकांच्या संतापात आगीत तेल ओतण्याचे काम केले. विरोधकही भडकल्याने सभापतींनी परिषदेचे कामकाज स्थगित केले.

शोकप्रस्तावानंतर कामकाज स्थगित
केंद्रीय राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता यांच्यासह विधानसभेच्या माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सभागृहातील पहिल्या दिवसाचे कामकाज संपुष्टात आले. शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांतील कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.
अध्यादेश, विधेयक सभागृहात ठेवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. जयवंतीबेन मेहता यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. यांच्यासह नुकताच निधन झालेले भंडाऱ्याचे आमदार राम आस्वले, नरसिंगराव पाटील, बाबूराव कोकाटे-आडसकर, अशोक साबळे, महादेव पाटील, मनोहर ऊर्फ बाळासाहेब तायडे, चुन्नीलालसिंग उक्कडसिंग रघुवंशी, तात्याराव जाधव, विमलताई बोराडे यांच्या कार्यांना देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, शेकापचे गणपत देशमुख तसेच आशिष शेलार, सुभाष पाटील, राज पुरोहित, डॉ. पोटे, चंद्रदीप नरके, संजय सिरसाट यांनी उजाळा दिला. विधान परिषदेत केवलचंद जैन, आनंदीराम कुमठ या दिवंगत नेत्यांच्या कार्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंग पंडीत, शेकापचे जयंत पाटील तसेच गिरीश बापट यांनी प्रकाश टाकला. शोकप्रस्तावानंतर विधानसभाध्यक्षांनी सभा उद्यापर्यंत स्थगित केली.

विरोधक आक्रमक होणार
सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नोटाबंदी या विषयावर विरोधक आक्रमक होणार आहेत. हिवाळी अधिवेशनात नोटाबंदी या विषयावर न्याय मागावा, असे विरोधकांना वाटते. त्यामुळे उद्या (ता. 6) याविषयी प्रारंभापासूनच आक्रमकता स्वीकारली जाईल अशी चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com