विदेशात संत्रा ज्यूस साडेतीनशे रुपये लिटर

Bablu-Chaudhary
Bablu-Chaudhary

नागपूर - आंतराष्ट्रीय बाजारात संत्र्याचा ज्यूस सरासरी साडेतीनशे रुपये लिटरने विकला जातो. त्याकरिता साधारणतः अर्धा डझन संत्री लागतात. चांगल्या दर्जाची अर्धा डझन संत्री आपल्याकडे फार फार साठ रुपयांना पडतात. त्यातून शेतकऱ्यांपर्यंत फक्त वीस ते पंचवीस रुपये पोहोचतात.

याचे प्रमुख कारण आपल्याकडे फळप्रक्रिया उद्योगच विकसित झाला नाही. सरकारही लक्ष देत नाही. याच कारणामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची हालत खस्ता होत चालली आहे. विदेशात आपल्याही वैदर्भीय शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा याकरिता नागपूरचा युवा उद्योजक बबलू चौधरी झटत आहे. 

बबलूने याकरिता नवीन साखळी संशोधित केली आहे. टेक्‍झिला येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेत त्यांची ‘शेतीव्यवसाय’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून निवड करण्यात आली. नेदरलॅंड येथील वान हॉल लेरिस्टिन वागलिंगन विद्यापीठातून त्याने ‘नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उच्च मूल्यांचा भाग देण्याबाबत तपास’ या विषयावर संशोधन केले आहे. संत्र्यावर संशोधन करणारा सर्वांत कमी वयाचा विद्यार्थी बबलू आहे. 

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या हे रोजच वाचायला मिळते. ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार? हा प्रश्‍न सर्वांना भेडसावत आहे. मात्र, नागपूरचा युवा उद्योजक बबलू चौधरी हा शेतकऱ्यांना विदेशात नफा मिळावा, याकरिता प्रयत्नशील आहे. विदर्भातील संत्री संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. मात्र, या संत्र्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आपल्याकडे प्रक्रिया उद्योग नाहीत. त्यामुळे आपले पीक आंतरराष्ट्रीय स्तरावर विकण्यायोग्य ठरत नाही. येथूनच सुरुवात आहे.

प्रक्रिया उद्योगाकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले तर, विदर्भातील पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी मिळेल. मात्र, कोणी मार्गदर्शन करीत नाही, सरकारलाही स्वारस्य नाही, एकदाचे पॅकेज देऊन वेळ मारून नेली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच खराब होत चालली आहे. मूळ समस्याच कोणी जाणून घेत नाही आणि उपाययोजना करीत नसल्याने आत्महत्याही थांबणार नाहीत आणि वारंवार हीच परिस्थिती उद्‌भवत राहील. 

बबलू सांगतो, आंतरराष्ट्रीय बाजारात संत्र्याचा ज्यूस ३५० प्रतिलिटर रुपये विकला जातो. प्रक्रिया शुल्क व खर्च यात १०० रुपये पडतो. विदेशात संत्रा ज्यूस विकला तर, एका लिटरवर २५० रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. बबलूने ‘इंनटरनॅशनल मास्टर्स ॲण्ड रिसर्च इन ॲग्रिकल्चर प्रोडक्‍शन चेन मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर चेन’मध्ये पदवी प्राप्त केली आहे. 

जागतिक स्तरावर तो शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग व जोड व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन करतो. 

कृषितज्ज्ञांना मार्गदर्शन
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कार्यशाळेत कृषितज्ज्ञांना मार्गदर्शन करतो. आंतरराष्ट्रीय फळबाग संशोधक म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत त्याला कृषी माउली, ॲग्री बिझनेस एक्‍सपर्ट पुरस्कार व पिलारस्‌ ऑफ न्यू इंडिया, इनोव्हेटिव्ह व्हॅल्यू चेन मॉडेल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

भारतातील विद्यार्थ्यांना शेतीव्यवसायाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे शेती व्यवसायाकडे त्यांचा कल वाढत नाही. त्याकरिता येथील शिक्षणपद्धतीत सुधारणा करणे, शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करणे, तसेच शेतीव्यवसायक संशोधन शिक्षण पद्धतीत बदल करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी विदेशात संशोधन करीत आहेत. गुणवत्ता वाढविण्याकरिता भारतातील शिक्षणपद्धतीतही बदल आवश्‍यक आहे. 
- बबलू चौधरी, युवा उद्योजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com