नागपुरातील संत्रा उत्पादकाची पुण्यात लाखोंनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

नागपूर - संत्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेल्या नागपूरच्या एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याला पुण्यातील एका प्रतिष्ठित मॉलधारकाने तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांनी गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. संत्री खरेदी केल्यानंतर मॉलने दिलेला अडीच लाखांचा धनादेश अनादरित झाला असून, याप्रकरणी शेतकऱ्याने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पुण्यातील बालगंधर्व परिसरात एप्रिल महिन्यात संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विदर्भातील संत्रा उत्पादकांना चांगले दर मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. विदर्भातील सात शेतकरी महोत्सवात सहभागी झाले. 55 रुपये प्रतिकिलोने 36 टन संत्र्याची विक्री या महोत्सवात करण्यात आल्याचा दावा आयोजकांचा आहे. विदर्भात संत्रा 15 रुपये किलो असताना पुण्यातील ग्राहकांकडून संत्रा 30 ते 55 रुपये किलोचा दर मिळाला.

शेतकऱ्याने दिला मॉलला माल
तब्बल 36 चाचण्या करीत सेंद्रिय संत्रा उत्पादनात नागपूर रहिवासी व अमरावती जिल्ह्यात शेती असलेल्या अशोक वसुले यांचा हातखंडा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनादेखील या संत्र्याने भुरळ घातली आहे. अशोक वसुले यांनी आठ टन संत्रा पुण्यातील संत्रा महोत्सवात नेला. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना एकच दिवस संत्रा महोत्सवात संत्रा विकता आला. त्यांनी उर्वरित संत्रा विकण्याचा सौदा पुण्यातील एका मॉलधारकाशी केला. 30 रुपये प्रति किलोने हा व्यवहार झाल्याचे अशोक वसुले सांगतात. संत्रा विक्रीपोटी 2 लाख 40 हजार रुपयांचा धनादेश संबंधित मॉलधारकाने दिला. परंतु, हा धनादेश नागपूरला परतल्यावर बॅंकेत जमा केला. मात्र पैसे नसल्याने तो परत आला. महिनाभरात तीनवेळा तशीच परिस्थिती आली. मॉलधारकाशी संपर्क साधल्यानंतर तो फोनला प्रतिसाद देत नसल्याचे अशोक वसुले सांगतात. त्यामुळे संबंधित मॉलधारकाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.

Web Title: orange producer cheating in pune