आनंदवार्ता! प्राध्यापकांची पदे भरण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

- विद्यापीठ अनुदान आयोगाचे विद्यापीठांना निर्देश
-  रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम
- विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या रॅंकिंगमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण
- पाच वर्षांत प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद
- आचारसंहितेचा फटका बसला भरती प्रक्रियेला

नागपूर : बहुतांश विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या रॅंकिंगमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोगाने चिंता व्यक्त केलेली आहे. यातूनच विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढून देशभरातील विद्यापीठांना सहा महिन्यांच्या आत पदभरती करण्याचे निर्देश दिले आहे.
राज्यासह देशभरातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षांत प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बंद आहे. बंदीमुळे अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या प्रकारामुळे विभागात शिकविण्यासाठी तासिका आणि कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र, केवळ एका वर्षाच्या कंत्राटीमुळे बरेच प्राध्यापक गांभीर्याने शिकवत नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत प्रचंड घसरण होत आहे. यापूर्वीही अनेकदा राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्राध्यापक भरतीसंदर्भात विद्यापीठ आणि सरकारी शैक्षणिक संस्थांनाकडून विनंती करण्यात आलेली आहे. मात्र, या विनंतीकडे राज्य व केंद्र सरकारकडून कुठलेच पाऊल उचलण्यात आलेले दिसत नाही. निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने 6 हजारांवर प्राध्यापकांची पदे भरण्यावर भर दिला. आचारसंहितेचा फटका भरती प्रक्रियेला बसला आहे. त्यामुळे राज्यात पदभरतीवर अनिश्‍चितता कायम आहे. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने खुद्द पदभरती करण्याचे निर्देश दिले आहे. 
राज्याच्या परवानगीची गरज 
राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांसह सर्वच सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि पॉलिटेक्‍निकसारख्या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापकांवर चालवावा लागतो. याउलट खासगी महाविद्यालयांना काटेकोर नियमांचे पालन करावे लागत असल्याने त्यांच्याकडे पुरेसे प्राध्यापक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जवळपास तीनशे प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. संलग्नित महाविद्यालयात जवळपास सहाशे पदे रिक्त आहेत. राज्यात त्याची संख्या 10 हजारांवर आहे. 
पदभरतीसाठी "टाइमबाउंड प्रोग्राम' 
विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा प्रथमच पदभरतीसाठी प्रभावी पाऊल उलचलले असून त्यासाठी "टाइमबाउंड प्रोग्राम' दिला आहे. यासाठी "राष्ट्रीय उच्च शिक्षण संशोधन केंद्रा'मध्ये (एनएचईआरसी) नोंदणी करून 15 दिवसांच्या आत माहिती द्यावी लागणार आहे. तीन दिवसांत परवानगी घेऊन एका महिन्यात जाहिरात आणि दीड महिन्यात मुलाखत घेऊन सहा महिन्यांत सर्व रिक्त पदे भरावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to fill the post of Professor