हे काय...? मृत लाईनमनच्या वृद्ध पत्नीला सव्वादोन लाखांचे बिल (व्हिडिओ)

संदीप रायपुरे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पतीचे निधन झाल्यानंतर अतिशय काटकसर करून कौशल्याबाई आपल्या संसाराच रहाटगाडग चालवीत आहेत. अशात गेल्या चार महिन्यांपासून महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने त्या प्रचंड हैराण आहेत. 

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तीन-चार खोल्यांचे लहानसे घर... दोन-तीन लाईट अनं घरी लहानसा टीव्ही... अशा घरचं महिन्याच लाईट बिल किती याव... चारशे, पाचशे किंवा जास्तीत जास्त सातआठशे रुपये... पण गोंडपिपरीत दिवंगत लाईनमनच्या वयोवृद्ध पत्नीला एका महिन्याच बिल सव्वादोन लाखांहून अधिक आहे. एवढेच नव्हे तर दुसरेही बिल तेवढेच आले...

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदीने त्रस्त वयोवृद्ध महिलेन बिल तर कमी करून आणले, पण पुन्हा विभागाकडून झटक्‍यावर झटके सुरूच राहिले अनं तिने बिलच न भरण्याचा निर्णय घेतला. विभागाने वीजपुरवठा बंद केला. आता ती आपल्या कुटुंबीयांसह अंधारात जीवन कंठीत आहे. 

le="text-align:center">


चंद्रपूर : अव्वाच्या सव्वा बिल आल्याने गोंधळलेल्या कौशल्याबाई उईके 

एकीकडे निसर्गाच्या चक्रव्युहाने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेने सामान्य जनता हैराण आहे. गोंडपिपरीच्या धाबा मार्गावर कौशल्याबाई खटुजी उईके कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. त्यांचे पती खटूजी उईके विद्युत विभागात लाईनमन होते. अनेक वर्षे त्यांनी विभागात सेवा दिली. त्याचवेळी त्यांनी येथील बाबूराव झाडे यांच्याकडून घर विकत घेतलं.

काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर अतिशय काटकसर करून कौशल्याबाई आपल्या संसाराच रहाटगाडग चालवीत आहेत. अशात गेल्या चार महिन्यांपासून महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने त्या प्रचंड हैराण आहेत. नेहमी पाचशे-सहाशे येणारे विजेचे बिल हाती पडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बिल होत सव्वादोन लाखाहून अधिक. विद्युत कंपनीच्या कार्यालयात अनेकदा खेटा घालून त्यांनी बिल कमी केले. परंतु दुसऱ्या महिन्यातही तेवढेच बिल आल्याने कौशल्याबाई संतापल्याच.

दुसऱ्या वेळी आलेले दोन लाख तेवीस हजार सातशे नव्वद रुपयांचे बिल पाहून त्यांनी डोक्‍यावर हात मारून घेतला. धाकधुकीचे वातावरण अनं प्रचंड संतापाखेरीज कौशल्याबाईकडे पर्यायच उरला नाही. याही वेळी कार्यालयात जाऊन त्यांनी बिल कमी केले. संतापून पुन्हा असे न होण्याची ताकीतही दिली. 

हेही वाचा : पाड्यापर्यंत पोहोचली वीज 

पुढच्या महिन्यात समाधानकारक बिल येईल आणि असे होणार नाही, असे तेथील कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु कधी दहा हजार, तर कधी सात हजार असे बिल येणे सुरूच असल्याने कौशल्याबाईंचा पार भडकला. अंधारात राहू पण हा वैताग नको असे ठरवून त्यांनी बिल न भरण्याचा निर्णय घेतला. एक-दोन महिन्याचे बिल थकल्यानंतर वीज कापण्यासाठी मात्र विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळ केला नाही. 

नवीन मीटरसाठी केला अर्ज 

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कौशल्याबाई कुटुंबीयांसह अंधारात जीवन कंठीत आहेत. परंतु, वीज नसल्याने रहायचे तरी कसे, असा प्रश्‍न असल्याने स्वत:साठी नव्हे तर कुटुंबीयांसाठी त्यांनी पुन्हा एकदा नवीन मीटरसाठी अर्ज केला. जुन्या मीटरमध्ये काही बिघाड असेल तर तो दुरुस्त करा किंवा नवीन मीटर देऊन ही भानगड कायमची संपवा, एवढीच त्यांची विनंती आहे. विद्युत कंपनीत वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या लाईनमनच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना झटका देणाऱ्या कंपनीच्या कारभाराबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over a million bills a month