बारमालकासह पाच आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नागपूर - शंकरनगर चौकातील क्‍लाउड सेव्हन बारमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर शुभम महाकाळकरच्या हत्याकांड प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. यामध्ये बारलमालकासह त्याच्या मुलाचा समावेश आहे. मुख्य आरोपी प्रमोद लिबन बरम्रोतवार (वय 53, रा. किराटपुरा, गांधीचौक) याला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाचे नाव जुळले असल्यामुळे आज दिवसभर शहरात हत्याकांडाची चर्चा होती.

नागपूर - शंकरनगर चौकातील क्‍लाउड सेव्हन बारमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर शुभम महाकाळकरच्या हत्याकांड प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. यामध्ये बारलमालकासह त्याच्या मुलाचा समावेश आहे. मुख्य आरोपी प्रमोद लिबन बरम्रोतवार (वय 53, रा. किराटपुरा, गांधीचौक) याला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाचे नाव जुळले असल्यामुळे आज दिवसभर शहरात हत्याकांडाची चर्चा होती.

रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजित हा अक्षय खांडरे आणि चार मित्रांसह शंकरनगर चौकातील क्‍लाउड सेव्हन बारमध्ये गेला होता. तेथे दारू पिल्यानंतर त्यांच्या बिलामध्ये डिस्काउंट देण्यावरून बारमालक सनी ऊर्फ सावन प्रमोद बरम्रोतवार याच्याशी वाद झाला. बाचाबाची झाल्यानंतर अभिजित खोपडेने मित्रासह बारमध्ये जबरदस्त तोडफोड केली. सनी बरम्रोतवार याच्या डोक्‍यावर दारूची बॉटल फोडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तोडफोड केल्यानंतर अभिजित खोपडे आणि त्याचे मित्र लक्ष्मीभुवन चौकात गेले. तेथून त्यांनी लहान भाऊ रोहित खोपडे, शुभम महाकाळकर आणि अन्य चार ते पाच मित्रांना फोन करून बोलावले. त्यानंतर पुन्हा बारमध्ये गेले आणि बारमधील वेटर, व्यवस्थापक आणि मालकाला मारहाण केली. ते सर्व लक्ष्मीभुवन चौकात गप्पा करीत उभे होते. दरम्यान, मुलांना मारहाण केल्याची माहिती बारव्यवस्थापक सिद्धार्थ पाटीलने सनीचे वडील प्रमोद बरम्रोतवार आणि लहान भाऊ शोभीतला दिली. ते काही साथिदारांसह बारमध्ये पोहोचले. त्यांना सनी हा रक्‍ताच्या थारोळ्यात दिसला. त्याने घडलेला प्रकार सांगितला. प्रमोद आणि मुलगा शोभीत आणि विवेक प्रदीप भालेकर (19, रा. गड्‌डीगोदाम, सुंदरबाग), पराग यादव गोगावले (19 रा. गड्‌डीगोदाम, परदेशीपुरा), कपिल राजेश अरखेल (19, रा. गड्डीगोदाम) यांच्यासह तीन कारने तलवार, चाकू आणि अन्य शस्त्रांसह लक्ष्मीभुवन चौकात गेले. त्यांचा अवतार पाहून अभिजित आणि रोहित खोपडे या दोघांनी पळ काढला. तर त्यांच्या तावडीत शुभम महाकाळकर सापडला. आरोपींनी शुभमवर तब्बल 17 घाव करीत निर्घृण खून केला. त्यावेळी अक्षय खांडरे हा अंधाराचा फायदा घेऊन एका पानठेल्याच्या मागे लपून सर्व प्रकार पाहत होता. आरोपींनी शुभमला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर तीनही कारची तोडफोड केली आणि निघून गेले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अक्षय खांडरेच्या तक्रारीवरून प्रमोद व त्याचा मुलगा शोभीत बरम्रोतवार व अन्य सात ते आठ युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी आज पाच आरोपींना अटक केली. सनी बरम्रोतवार याच्या तक्रारीवरून अभिजित, रोहित खोपडे, अक्षय खांडरे सह अन्य पाच जणांवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांवर राजकीय दबाव
क्‍लाउड सेव्हनचा बारमालक सनी ऊर्फ सावन प्रमोद बरम्रोतवार (22) याच्यावर प्राणघातक हल्ला करणारे अभिजित खोपडे, रोहित खोपडे, अक्षय खांडरे यांच्यासह सात ते आठ आरोपींवर अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा शोध घेत असल्याची माहिती अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अच्युत सबनीस यांनी दिली. यातील दोन आरोपी सत्ताधारी आमदारांचे पुत्र असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The owner of the bar with the arrest of five suspects