ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले
नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू झालेल्या योजना आणि उपक्रमांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.

ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले
नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू झालेल्या योजना आणि उपक्रमांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.
ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यात सुरत, आग्रा, बंगळुरू, हैदराबादसह नागपूरचाही समावेश आहे. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नागपूरला यात स्थान मिळाले आहे. नागपूरमध्ये मिहान हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प विकसित होत आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. देशाचे मध्यवर्ती स्थान असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्या नागपूरला पसंती देत आहेत. याशिवाय नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेकामही हायस्पीडने सुरू आहे. नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपये शहराच्या विकासासाठी खेचून आणले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अनुदान देत आहेत. यामुळे शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत चालला आहे, यात शंका नाही. ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

चाळीस वर्षांत जेवढा निधी शहराच्या विकासासाठी मिळाला नाही तेवढा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांत उपलब्ध करून दिला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये असलेले व्हीजन आणि केंद्रात आणि राज्यात असलेल्या दबदब्यामुळे हे शक्‍य झाले. भाजपने नियोजनबद्ध नागपूरच्या विकासावर भर दिला आहे. अनेक दर्जेदार तसेच मोठ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहे. रोजगार, उद्योजकांसाठी पोषक वातावरण तयार केले. सध्या विकासाची फक्त सुरुवातच झाली आहे. येत्या काळात सर्वाधिक विकसित शहरांच्या यादीत नागपूरचे नाव झळकेल.
- संदीप जोशी, सत्तापक्षनेते, महापालिका

भाजपला देखावा करण्याची सवयच आहे. मुळात मिहान असो वा मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉंग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाले होते. त्याचे श्रेय आता भाजप लाटत आहे. शहरासाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र, फक्त शहरांच्या विकासावरच भाजप लक्ष देत आहेत. त्यामुळे भविष्यात शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पेटणार आहे. आज शहरात येणाऱ्या लोंढ्यांना सामावून घेण्याची व त्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे शहरापेक्षा आता ग्रामीण भागाचा अधिक विकास करण्याची गरज आहे. अन्यथा विकासाचा असमतोल निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
- प्रफुल्ल गुडधे, ज्येष्ठ नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxford report for Nagpur