अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीत ऑक्‍सिजनची निर्मिती; कोविड रुग्णांना तातडीने मिळणार प्राणवायू 

सुधीर भारती 
Wednesday, 28 October 2020

काचवेळी तीन हजार ऑक्‍सिजन सिलिंडर भरण्याची क्षमता या टॅंकमध्ये राहणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनवर असलेल्या कोविड रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.

अमरावती ः कोविड रुग्णांसाठी मध्यंतरी ऑक्‍सिजनची कमतरता हा विषय अतिशय गंभीर बनला होता, मात्र आता कोविड रुग्णांना ऑक्‍सिजनची कुठलीही कमतरता भासणार नाही. सुपर स्पेशालिटीमध्ये तयार करण्यात आलेला ऑक्‍सिजन टॅंक आता जवळपास पूर्ण झालेला असून येत्या चार ते पाच दिवसांत या टॅंकमधून ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरू होणार आहे. एकाचवेळी तीन हजार ऑक्‍सिजन सिलिंडर भरण्याची क्षमता या टॅंकमध्ये राहणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनवर असलेल्या कोविड रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.

कोविडचे संक्रमण पाहता शहरात 11 कोविड सेंटर तसेच पाच ठिकाणी कोविड हेल्थ केअर सेंटरला जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली. मध्यंतरीच्या काळात कोविडच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. विशेष म्हणजे, रुग्णालयात दाखल अनेक रुग्णांना ऑक्‍सिजन तसेच व्हेंटिलेटर लावावे लागले. पर्यायाने ऑक्‍सिजन बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयांमध्ये सुद्धा ऑक्‍सिजनचा तुटवडा झाला. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतच अमरावतीकरांची सुद्धा काळजी वाढली. 

ठळक बातमी - निंदनीय घटना : दहा हजारांच्या कर्जासाठी सावकाराने महिलेवर केला बलात्कार

शहरात निर्माण झालेला ऑक्‍सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी नागपूरवरून ऑक्‍सिजन सिलिंडर मागविण्यात आले. यादरम्यान अमरावतीमध्येच ऑक्‍सिजन टॅंकच्या निर्मितीला शासनाकडून हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यानंतर सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पीडीएमसीमध्ये ऑक्‍सिजन टॅंकच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. प्राधान्याने सुपर स्पेशालिटीमधील ऑक्‍सिजन टॅंकची ट्रायलसुद्धा संपली आहे. त्यामुळे येथून आता मुबलक प्रमाणात ऑक्‍सिजन सिलिंडरची निर्मिती होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

रुग्णसंख्या घटली

शहर तसेच जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीसुद्धा नागरिकांनी हलगर्जीपणा करता कामा नये तसेच लक्षणे असलेल्यांनी मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

जाणून घ्या - आधी ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ते सांगा...

जिल्ह्यात 125 रुग्ण गंभीर श्रेणीत

कोविड रुग्णांची संख्या घटत आहे, ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील आकडेवारी पाहता 79 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 50 रुग्णांना ऑक्‍सिजन देण्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोविड सोबतच धुमाकूळ घालणाऱ्या सारी या आजाराच्या रुग्णांमध्ये देखील मोठी घट आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक सारी वॉर्ड पूर्णपणे रिकामा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen making by Amravati super speciality hospital for covid patients