वर्ध्याच्या निवेदिता भिडेंना समाजसेवेसाठी पद्मश्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नागपूर - मूळच्या वर्धा येथील आणि सध्या कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा श्रीमती निवेदिता भिडे यांना समाजसेवेसाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. श्रीमती भिडे गेल्या 40 वर्षांपासून विवेकानंद केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत.

नागपूर - मूळच्या वर्धा येथील आणि सध्या कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा श्रीमती निवेदिता भिडे यांना समाजसेवेसाठी पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. श्रीमती भिडे गेल्या 40 वर्षांपासून विवेकानंद केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत.

वर्धा येथील जुन्या काळातील संघ स्वयंसेवक रघुनाथराव भिडे यांच्या कन्या निवेदिता या 1977 मध्ये विवेकानंद केंद्राशी जुळल्या. केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी केंद्राच्या पूर्णकालीन कार्यकर्त्या म्हणून तमिळनाडूमधील ग्रामीण भागात ग्रामविकासाचे काम सुरू केले. काही काळ त्यांनी कन्याकुमारीत केंद्रातर्फे ग्रामीण मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या शाळेच्या प्राचार्या म्हणूनही काम पाहिले. केंद्राच्या ईशान्य भारतातील शाळांची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. वनवासी जनजातींच्या जीवनपद्धती, त्यांची संस्कृती, प्रथा, परंपरा यांच्या अभ्यासक असलेल्या भिडे यांनी या जनजातीतील मुलांना शिक्षण देण्याच्या क्षेत्रात बरेच काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षपदाची व केंद्राच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी आहे. त्यानिमित्त त्या देशभरात सतत प्रवासात असतात.

श्रीमती भिडे यांना तीन भाऊ व तीन बहिणी आहेत. एक भाऊ, श्रीकृष्ण भिडे हे संघाचे प्रचारक असून वनवासी कल्याण आश्रमाचे ते ईशान्य भारत क्षेत्राचे संघटनमंत्री आहेत. संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विदेशात संघाच्या कामाची पायाउभारणी करणारे स्व. लक्ष्मणराव भिडे हे निवेदिता यांचे काका होत.

हा पुरस्कार संघटनेचा
पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनंदनासाठी निवेदिता भिडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्या संघटनात्मक कामानिमित्त प्रवासात होत्या. पुरस्काराबाबत त्या म्हणाल्या, ""हा पुरस्कार मला घोषित झाला असला तरी तो मी वैयक्तिक मानत नाही. हा पुरस्कार केवळ माझा नाही. विवेकानंद केंद्राचे जे असंख्य कार्यकर्ते देशभरात, दुर्गम भागात समाजसेवा करीत आहेत त्या सर्वांच्या कार्याला मिळालेली ती पावती आहे. हा संघटनेला मिळालेला पुरस्कार आहे. मी केवळ निमित्त आहे.'

Web Title: padmashri award to nivedita bhide