'जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

नागपूर - जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. कर्माने अध:पतन आणि उत्क्रमणही होते. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचे कर्म करावे, ते आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. तसेच कर्म कोणत्या श्रद्धेने करतोय हेही महत्त्वाचे आहे, असे मत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी व्यक्त केले.

नागपूर - जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. कर्माने अध:पतन आणि उत्क्रमणही होते. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचे कर्म करावे, ते आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. तसेच कर्म कोणत्या श्रद्धेने करतोय हेही महत्त्वाचे आहे, असे मत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी व्यक्त केले.

डॉ. राजन पांडेय यांच्या "बुक ऑफ लाइफ‘ या सकारात्मक विचारांवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता. 3) क्रेझी कॅसल येथे आयोजिण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पहलाज निहलानी बोलत होते. व्यासपीठावर लेखक डॉ. राजन पांडे, खासदार कृपाल तृमाने, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, डॉ. एच. पी. पांडेय, प्रफुल्ल गाडगे उपस्थित होते. निहलानी म्हणाले, जीवनाची खरी किंमत ही त्याच्या आचार-विचारावरून समजते. जीवनात फक्त पैसा महत्त्वाचा नसून, माणसाचा आंतरिक विकास होणे गरजेचे आहे. आंतरिक विकासातून सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

बनवारीलाल पुरोहित यांनी पुस्तकाबाबत बोलताना अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक प्रत्येकाने आयुष्यातील कठीण प्रसंगी वाचण्याचा सल्ला दिला. जीवनातील चढ-उतार झेलण्याची शक्ती देणारे शब्द यात असल्याचे ते म्हणाले. डॉ. गिरीश गांधी यांनी डॉ. पांडेय यांची लिखाणसाधना अशी सुरू राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पुस्तकातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अनुकरणीय असल्याचे कौतुकोद्‌गार काढले. डॉ. राजन पांडेय यांनी पुस्तकाची संकल्पना थोडक्‍यात मांडली. याप्रसंगी डॉ. एच. पी. पांडेय, एस. एन. विनोद, प्रदीप मैत्र यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अजय पाटील, प्रगती पाटील, अजय निलदावार यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Web Title: pahlaj nihalani in nagpur