पैनगंगा नदीपात्रातील आंदोलनाची सांगता

राजकुमार भीतकर
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी इसापूर धरणातून 5 दलघमी व नांदेड जिल्हाधिकारी यांनी 7 दलघमी पाणी पैनगंगेच्या पात्रातून  पिण्यासाठी सोडण्याचा आदेश सोमवारी दिला. आमदार राजेंद्र नजरधने यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आंदोलकाशी चर्चा केली. अखेर आंदोलकानी धरणे मागे घेण्याचा निर्णय घेतला.

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील बोरी चातारी येथील पैनगंगा नदीपात्रात गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेले धरणे आंदोलन सोमवारी रात्री आठदरम्यान स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले.

जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी इसापूर धरणातून 5 दलघमी व नांदेड जिल्हाधिकारी यांनी 7 दलघमी पाणी पैनगंगेच्या पात्रातून  पिण्यासाठी सोडण्याचा आदेश सोमवारी दिला. आमदार राजेंद्र नजरधने यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आंदोलकाशी चर्चा केली. अखेर आंदोलकानी धरणे मागे घेण्याचा निर्णय घेतला. आदेशानुसार ब्राह्मणगाव वितरिकेतून रात्री 8.15 ला पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, बाबुराव कदम, एसडीओ स्वप्नील कापडणीस, शाखा अभियंता विनोद पाटील, सुनील टाक, आंदोलक तुकाराम माने, धनंजय माने, चक्रधर देवसरकर, प्रकाश माने, श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती.

आंदोलकाशी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार राजेंद्र नजरधने यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: painganga river agitation over in Yavatmal