नाना गुरू भक्तीची लोटांगणाची आगळीवेगळी परंपरा

दिनकर गुल्हाने
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू महाराज यांच्या पालखीपुढे लोटांगण घालण्याची प्रथा भाविकांनी जोपासली आहे.

पुसद (जि. यवतमाळ), ता. 29 : परमेश्वर आणि संतांपुढे भक्ती अर्पित करण्याचे नानाविध प्रकार आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिरखेड येथे श्रीसंत नाना गुरू महाराज यांच्या पालखीपुढे लोटांगण घालण्याची प्रथा भाविकांनी जोपासली आहे.
कार्तिक वद्यअष्टमीला संत नाना गुरू महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करण्यात येते. या दिवशी शिरखेड गाव भाविकांनी गजबजून जाते. गावच्या मध्यभागी श्री संत नाना गुरू महाराज यांचे यांचे मंदिर आहे. मंदिरात श्री नाना गुरू महाराज यांची सर्वांगसुंदर मूर्ती आहे. पुण्यतिथीला दुपारी बारा वाजता मूर्ती मंदिरासमोरील पालखीत विराजित करण्यात येते. त्यासाठी लोटांगण घालणारी मुले पालखी सभोवती एकच गर्दी करतात. हातात नारळ वा अगरबत्ती असते. अंगावर बादलीभर पाणी घेतलेली ही हुडहुडी भरलेली मुले पवित्र जलाचा तोंडावर शिडकावा मिळताच पालखीपुढे लोटांगण घेतात. ही संख्या दीडशे ते दोनशे एवढी असते. पालखी जसजशी पुढे-पुढे सरकते तसे लोटांगण जमिनीवरून रस्त्याने लोळत पुढे-पुढे चालतात. डोळे मिटलेले आणि हात जोडलेले हे लोटांगण रस्त्यावरून नीट निघण्यासाठी नागरिक सेवा देतात. अंगातील उष्मा कमी करण्यासाठी लोटांगणावर अधूनमधून बादलीभर पाणी टाकण्यात येते. रस्त्यावर चिखल होतो. चिखल मातीने भरलेले लोटांगण नाना गुरू भक्तीत लीन होते. कुणालाही खरचटत नाही वा दुखापत होत नाही. "चला देवा' असे म्हणत कार्यकर्ते लोटांगणाची माळ हळहळू पुढे सरकवितात. या लोटांगणांचे विसर्जन शिरखेड गावच्या पूर्वेला चंदभागा नदीवर तर काहींचे पश्‍चिमेला असलेल्या काशी नदीवर करण्यात येते. लोटांगणाची ही परंपरा सातत्याने सुरू आहे. लोटांगणातून मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या लोटांगण कार्यक्रमासाठी सासरी गेलेल्या मुली शिरखेडात आज आवर्जून येतात. सगळे गाव चैतन्याने भारून जाते.

Web Title: palakhi news pusad