लॉकडाऊनमुळे पान बनारसवालाची रंगत गेली! आत पान शौकिनांनी लढवली ही शक्‍कल

vidyache pan.
vidyache pan.

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : कळीदर कपूरी पान, पान खायो सैया हमारो किंवा खैके पान बनारसवाला ही सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झालीत याला कारण लोकांचे विड्याच्या पानाविषयीचे प्रेम. पानठेल्यावर उभे राहून बनारसी पानाचा आस्वाद घेणे आणि शिळोप्याच्या गप्पा मारणे, ही संस्कृती आपल्याकडे आहे. पूर्वी पानठेल्यावर दुकानदार जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड लावायचे आणि काही संगीत रसिक मुद्दाम ती गाणी ऐकण्यासाठी तिथे गोळा व्हायचे. पानाचा शौक हे रसिकपणाचे लक्षण मानले जाते. मात्र लॉकडाऊनने या रसिकतेला खिळ बसली आहे.

लॉकडाउनमुळे गेल्या काही महिन्यांपासून पानठेले बंद असल्याने पान शौकिनांचा हिरमोड झाला आहे, यावर उपाय म्हणून आता पुन्हा घराघरांतील पानपुडे बाहेर निघाले असून पूर्वीप्रमाणे आता पुन्हा घरातच पानाचा विडा बनवून पानाची तलब भागविली जात आहे. यामुळे खुले पान विकण्याच्या व्यवसायाला पुन्हा संजीवनी मिळाली असल्याचेही पाहायला मिळते.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत बैठकीत चहापाणी झाल्यावर किंवा जेवण झाल्यावर घरातला पानपुडा काढून घरीच पानाचा विडा बनवून खाल्या जात होता, त्यासाठी घरातच कात, चुना, लवंग विलायची, भरडा सुपारी असे साहित्य ठेवले जात होते. कालांतराने पान ठेल्यांवरील विविध चवीच्या पानांत घराघरांतील हे पानपुडे मागे पडले. चौका-चौकांत पानाची दुकाने लागल्याने ते सहज उपलब्ध झाल्याने नव्यापिढीला हा पानपुडा, अडकित्ता यागोष्टी माहीतच नाहीत.

घरातील आजी-आजोबांच्या या सुदृढ विड्याची जागा पानठेल्यावरील रेडिमेड पानांनी घेतली होती. परंतु कोरोनाच्या या संकटात लॉकडाउनमुळे काही पानठेले व त्यावरील खर्रे कोरोना पसरविण्याचे हॉटस्पॉट बनत गेल्याने इतर दुकाने सुरू असली तरी पान दुकान मात्र अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे काहींनी या पानाच्या विड्याच्या मोहाला आवर घातला तर काहींनी घरातील आपले जुने पानपुडे पुन्हा बाहेर काढले आहे. त्यामुळे पुन्हा चौका-चौकांत खुले पान विकणाऱ्यांच्या रोजगाराला अभय मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

विड्याचे पान गुणकारी
पान खाण्याच्या क्रियेला आयुर्वेदात तांबूलसेवन असे म्हटले जाते. पानात सोपं, ओवा, लवंग यासारखे विशिष्ट पदार्थ टाकून ते खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. पान शरीरातील अनेक व्याधींपासून आपले संरक्षण करू शकते. याशिवाय पानात अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. पानाचा वापर प्राचीन काळापासूनच औषधांसाठी केला गेल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात, असे मत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ सुनील कडू यांनी व्यक्त केले

तरी धंदा तोट्यातच
पानठेले बंद असल्याने घरगुती पान खाण्याचे प्रमाण वाढले असले तरी मार्केट बंद असल्याने लोक घराबाहेर निघत नाहीत. त्यामुळे अजूनही पान व्यवसाय तोट्यातच आहे. घरगुती खाण्यासाठी विड्याची पाने जातात, पण पाहिजे तसा जोर अजून पकडला नसल्याचे मत पान व्यावसायिक पंजाबराव उके यांनी व्यक्त केले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com