सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपरही फुटला

file photo
file photo

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली.
आशीष श्रीराम राऊत (वय 28, रा. बोर्डी, ता. अकोट) व निखिल अशोक फाटे (वय 27, रा. गाडगेनगर, अमरावती) या दोघांना जिल्हा न्यायालयाने शनिवारी (ता. 15) जामीन मंजूर केला. त्यापूर्वी पोलिसांनी पेपरफूट प्रकरणात पीयूष तायडे, स्वप्नील लांडगे या दोघांचे बयाण नोंदविले. त्या दोघांना परीक्षा केंद्रावर सिव्हिल इंजिनिअरिंगचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपर सोडवीत असताना परीक्षकाने पकडले होते. त्यावेळी हे प्रकरण विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेले होते. परंतु, विद्यापीठ प्रशासनाच्या मुल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयाचा थेरी ऑफ स्ट्रक्‍चर या विषयाचा पेपरसुद्धा फुटला होता, याचा उल्लेख केला नाही.
तक्रारीत केवळ मॅकेनिक या विषयाच्या पेपरफुटीचा मुद्दा पुढे केल्या गेला. त्यावेळी पोलिसांनी पीयूष व स्वप्नील या दोघांचे बयाण नोंदविले. त्यात त्यांनी हा पेपर गाडगेनगर परिसरातील एका दुसऱ्या कोचिंग क्‍लासशी संबंधित संचालकांकडून शंभर रुपयांमध्ये विकत घेतला, अशी कबुली दिल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी सांगितले. पेपरफूट प्रकरणात एका कोचिंग क्‍लासच्या संचालकाचा भाऊ निखिल फाटे याला अटक झाली होती, तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. मात्र, आता सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयाच्या पेपरफूट प्रकरणात गाडगेनगरातील दुसऱ्या एका कोचिंग क्‍लासवर पोलिसांची नजर आहे. पोलिसांनी त्या क्‍लासचा नामोल्लेख करण्याचे टाळले असून, त्याच्याशी संबंधित असलेल्यांच्या अटकेची कारवाई सुरू केली आहे.

विद्यापीठाकडून माहिती मागविली जाईल
बीई मॅकेनिक पाठोपाठ चौकशीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा थेरी ऑफ स्ट्रक्‍चर, या विषयाच्या पेपरफुटीचे प्रकरण पुढे आले. विद्यापीठ प्रशासनाकडून त्याबाबतची विस्तृत माहिती मागितली जाईल, असे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com