पारडी, पूनापूर, भरतवाडा "स्मार्ट ट्रॅक'वर

राजेश प्रायकर
बुधवार, 17 मे 2017

टीपी स्किमसाठी सल्लागाराला कार्यादेश - स्मार्ट सिटी एसपीव्ही संचालकांची मंजुरी

टीपी स्किमसाठी सल्लागाराला कार्यादेश - स्मार्ट सिटी एसपीव्ही संचालकांची मंजुरी
नागपूर - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी निवडण्यात आलेल्या पारडी, पूनापूर, भरतवाडा या क्षेत्राच्या टाऊन प्लानिंग स्किमसाठी (नगररचना परियोजना) सल्लागार कंपनीला कार्यादेश देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे जवळपास साडेनऊशे एकरातील इमारती, मोकळ्या जागांचा कायापालट होणार असून, सुमारे दोन लाख लोकांचे राहणीमान उंचावण्याची शक्‍यता आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प राबवित असलेल्या नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्हीच्या संचालकांची बैठक नुकताच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पारडी, पूनापूर, भरतवाडा या एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी निवड झालेल्या भागाकरिता टाउन प्लानिंग स्किम तयार करण्याचा विषय चर्चेला आला. टाउन प्लानिंग स्किम तयार करण्यासाठी अहमदाबाद येथील एचसीपी कंपनीला सल्लागार नियुक्त करण्यात आले. या कंपनीला टाऊन प्लानिंग स्किम तयार करण्यासंदर्भात कार्यादेश देण्यासाठी संचालकांनी मान्यता दिली. टाउन प्लानिंग स्किम तयार करण्यासाठी या कंपनीला एसपीव्ही 71 लाख रुपये देणार आहे.

एससीपी कंपनीने यापूर्वीच भरतवाडा, पूनापूर, पारडी येथील 951 एकर क्षेत्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले. आता टाउन प्लानिंग स्किमचाही मार्ग मोकळा झाला आहे.

स्मार्ट व सेफसाठी 103 कोटी
शहरात स्मार्ट व सेफ सिटीची कामे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र आयटी कार्पोरेशन लिमिटेड या एसपीव्हीतर्फे सुरू आहे. या कामांसाठी नागपूर स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी कार्पोरेशन महाराष्ट्र आयटी कार्पोरेशनला 103 कोटी रुपये देणार आहे. हा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

कार्यालयासाठी सहा कोटी
नागपूर स्मार्ट सिटी एसपीव्हीचे कार्यालय महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सातव्या माळ्यावर प्रस्तावित आहे. अत्याधुनिक पद्धतीचे कार्यालय तयार करण्यासाठी 5 कोटी 84 लाख, 63 हजारांचा खर्च प्रस्तावित आहे. स्मार्ट सिटी कार्यालयाचा प्रस्ताव एसपीव्हीच्या पुढील बैठकीत येणार आहे.

Web Title: paradi, punapur, bharatwada, on smart track