कारावासाच्या शिक्षेनंतर आमदार कडू यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

परतवाडा (जि. अमरावती) - ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यासह चार जणांना आज अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

परतवाडा (जि. अमरावती) - ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यासह चार जणांना आज अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

आमदार कडू, अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख व धीरज निकम अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यानंतर आरोपींतर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला गेला. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने आमदारांसह चौघांना प्रत्येकी सात हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.

परतवाडा येथे बस स्थानक चौकात 23 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धीरज काशिनाथ निकम (रा. देवमाळी, परतवाडा) यांना ड्यूटीवर तैनात वाहतूक शिपाई इंद्रजित चौधरी यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटारवाहन कायद्यान्वये चालान देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. थोड्याच वेळात अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांसह अन्य काही साथीदार येथे पोचले. ड्यूटीवर तैनात वाहतूक शिपाई चौधरी यांच्यासोबत वाद घालून आमदारांसह त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिस शिपाई चौधरी यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आमदार बच्चू कडूंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. परतवाड्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांनी तपास पूर्ण करून 19 जुलै 2016 रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

न्यायालयाने आरोपी आमदारांसह अन्य तिघांविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने चौघांनाही सहा महिन्यांच्या साध्या कारावासाच्या शिक्षेसह प्रत्येकी एक हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती सावरकर यांनी युक्तिवाद केला होता. सोबतच अभियोग पक्षाला सहायक म्हणून नागपूर येथील ऍड. अनिल धवस यांनी काम पाहिले होते.

त्याविरोधात आवाज उठवू
न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो; परंतु 353 व 186 ही कलमे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कवचकुंडले झाली आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवेन. वैयक्तिक कामासाठी वाहतूक शिपायाशी चर्चा केलेली नव्हती, असे आमदार कडू यांनी निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: paratwada amravati news mla bacchu kadu bell