पालकानो, अल्पवयीनांच्या हाती नका देऊ दुचाकीची चावी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

  • दुचाकी अपघातात अल्पवयीन युवकाचा मृत्यू
  • शाळकरी मुले ठोकतायेत धूम
  • रस्ता जनजागृतीच्या दिवस ठरला अपघातवार
  • अकोटफैल पोलिसांची सकाळ संध्याकाळी धावपळ

अकोला ः रिंग रोडवर दोन दुचाकींमध्ये शनिवारी (ता.30) सायकांळी चार वाजताच्या सुमारास भिषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात वर्धमान नगर येथील समर्थ ज्ञानेश्‍वर घवघवे नामक युवक जागेवरच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीचा चालक हेल्मेटमुळे वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

तुकाराम चौक ते कौलखेड या दरम्यान असलेल्या रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयाजवळ दोन दुचाकींमध्ये समोरा समोर धडक झाली. दोन्ही दुचाकींचा क्षमतेपेक्षा अधीक वेगाने असल्यामुळे या भिषण अपघातात रिंग रोडवरीलच वर्धमान नगर येथील रहिवासी समर्थ ज्ञानेश्वर घवघवे (वय 17) या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरातच असलेले स्थायी समिती सभापती विनोद मापारी त्यांचे मित्र गिरीश इंगळे व सागर चव्हाण यांनी या युवकाला गंभीर जखमी असल्याचे पाहून तातडीने एका आॅटोमधून खासगी हॉस्पीटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याचे सांगितले. एका दुचाकीवर असलेल्या समर्थचा मृत्यू झाला मात्र दुसऱ्या दुचाकीवर असलेला युवकही सिमेंट कोसळला मात्र डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण वाचल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

No photo description available.

पालकानो, अल्पवयीनांच्या हाती नक देऊ चावी
पाठीवर शाळेचे दफ्तर... डोळ्यांवर स्टायलिश गॉगल... पाठीमागे डबल व ट्रीपल सीट ... या अवस्थेत कर्कश हॉर्न वाजवत बेफाम होऊन दुचाकी पळवायची... असे चित्र शहरातील शाळा, खासगी शिकविण्या, उद्याने आदी परिसरात सर्रास पहायला मिळत आहेत. या अल्पवयीन मुला-मुलींकडून धूम स्टाईलने दामटली जात आहे. त्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात असताना वाहतूक पोलिसांकडून केवळ समज देण्याची ‘कारवाई’ केली जाते. पालकांच्या निर्धास्तपणामुळे अल्पवयीन मुलांच्या दुचाकींने अपघाताचे धोका वाढत आहे.

कायदा काय सांगतो
मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविणाऱ्या 18 वर्षांखालील मुलांसंदर्भात वाहनमालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 4 पोट कलम () अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम 18 अन्वये सार्वजनिक ठिकाणी वीस वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही. तरीही बिनधास्तपणे अशी वाहने चालविली जात आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाणही आहे.

शिक्षा काय होऊ शकते?
मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व 25 हजार रुपये दंड, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद करण्यात आली आहे.

अन् पुलावरच झाले टॅंकरचे ब्रेक फेल !
अकोटफैल पोलिस ठाण्याजवळील पुलावर अकोटकडे जाणाऱ्या एका टॅंकरचे ब्रेक फेल झाल्याने या टॅंकरने रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. ही घटना शनिवारी (ता.30) दुपारी 12.15 वाजता दरम्यान घडली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतून मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

अकोल्याहून अकोटकडे जाणाऱ्या एम.एच. 43 वाय 3180 या क्रमांकाच्या पेट्रोल टॅंकरचे ब्रेक ऐन अकोटफैलच्या पुलावरच फेल झाल्याने या टॅंकरने ऑटो क्रमांक एम.एच. 30 डीसी 1690 ला जबर धडक दिली. या धडकेत ऑटोचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलिस घटनास्थळी दाखल होऊन विस्कळीत झालेली वाहतूक तत्काळ सुरळीत केली. मात्र, तब्बल एक ते दीड तास विस्कळीत झालेल्या या वाहतुकीमुळे वाहनधारकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला ऐवढे मात्र खरे. याप्रकरणी पुढील तपास अकोटफैल पोलिस करीत आहेत.

डिझेल घेऊन जाणारा टॅंकर उलटला !
अकोल्याहून हजारो लिटर डिझेल घेऊन अकोटकडे जाणाऱ्या टॅंकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टॅंकर शेतात जाऊन उलटले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टॅंकरमधून इंधनाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने परिसरात तिव्र दुर्गंधी पसरली होती. ही घटना शनिवारी (ता.30) रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलिसांसह अग्नीशमन विभाग दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायगाव येथील इंधन डेपोवरून हजारो लिटर डिझेल घेऊन जाणारा टॅंकर क्रमांक एम.एच.30 एल 1919 अकोटकडे जात होता. या दरम्यान अकोटफैल पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वल्लभनगराजवळ वाहनांवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाले. यामध्ये चालकाला कुठलीही दुखापत झाली नाही मात्र, टॅंकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होतीघटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश अणे यांनी डीबी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. टॅंकरमधून निघणाऱ्या इंधनामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी अग्नीशमन विभागालाही घटनास्थळ पाचारण करण्यात आले होते. यावेळी रात्री उशिरापर्यंत गळणाऱ्या इंधनाला थांबविण्याचे प्रयत्न सुरू होते.

Image may contain: 1 person, motorcycle and outdoor

शनिवार ठरला घटनेचा वार
शनिवार खऱ्या अर्थाने अकोलेकरांसाठी घटनेचा वार ठरल्याचे दिसून आले. दुपारी बारा वाजता दरम्यान अकोटफैलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर टॅंकरचे ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन वाहनांचे नुकसान झाले होते. तर जानोनकर मंगलकार्यालयाजवळ घडलेल्या दुचाकीच्या अपघातात अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, या घटनेनंतर रात्री उशिराला डिझेल घेऊन जाणारे टॅंकर उलटल्याने अकोटफैल पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents, do not hand over a bike to a minor