प्रवासी रेल्वेगाड्यांना डोंगरगडला थांबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नागपूर  : नवरात्रोत्सवादरम्यान मॉं बम्लेश्‍वरीच्या दर्शनासाठी डोंगरगडला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांच्या सुविधेसाठी डोंगरगड स्थानकावर सर्वच प्रवासी रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शिवाय, इतवारीहून मेला स्पेशल पॅसेंजरही सोडण्यात येईल. 29 सप्टेंबर ते 7 ऑक्‍टोबरदरम्यान ही सुविधा उपलब्ध राहील.

नवरात्रोत्सवादरम्यान डोंगरगड येथे लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. रेल्वेमार्गे पोहोचणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. यामुळे रेल्वेगाड्यांसुद्धा "हाउसफुल्ल' धावतात. गाड्यांमधील गर्दी विभागण्याच्या दृष्टीने सर्वच प्रवासी गाड्यांना डोंगरगड येथे अस्थायी स्वरूपात केवळ दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. अन्य गाड्यांप्रमाणेच 12851 बिलासपूर-चेन्नई एक्‍स्प्रेस, 12852 चेन्नई-बिलासपूर एक्‍स्प्रेस, 12812 हटिया-कुर्ला हटिया एक्‍स्प्रेस, 12811 कुर्ला-हटिया एक्‍स्प्रेस, 20813 पुरी-जोधपूर एक्‍स्प्रेस, 20814 जोधपूर-पुरी एक्‍स्प्रेस, 12906 हावडा-पोरबंदर एक्‍स्प्रेस, 12905 पोरबंदर-हावडा एक्‍स्प्रेस डोंगरगड स्थानकावर थांबेल. तसेच 08684/08683 डोंगरगड-इतवारी-डोंगरगड ही मेला स्पेशल पॅसेंजर नवरात्रीच्या काळात धावेल. गोंदियापर्यंत धावणाऱ्या काही पॅसेंजर गाड्यांचा विस्तार करण्यात आला आहे.
भाविकांची सुविधा लक्षात घेता डोंगरगड स्थानकावर विशेष सुविधा केल्या आहेत. चौकशीसाठी अतिरिक्त कक्ष, अतिरिक्त प्रसाधनगृह, उद्‌घोषणा प्रणालीद्वारे सतत गाड्यांच्या माहितीचे प्रसारण, स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने नागरिक सुरक्षा संघटन, स्काउट-गाइड उपलब्ध राहतील. गर्दी लक्षात घेता अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी, वाणिज्य निरीक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger trains stop at the Dongarghad