यवतमाळमध्ये लक्षणे नसणाऱ्यांचीही रुग्णालयांकडेच धाव; कमी मनुष्यबळामुळे डॉक्‍टरांची होतेय कसरत

corona virus
corona virus PASIEKA

यवतमाळ : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा आकडा हाताबाहेर जात आहे. गंभीर रुग्णांवरच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करायला पाहिजे. मात्र, पॉझिटिव्ह येताच लक्षणे नसणारेही उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेताना दिसून येत आहेत. त्यातच "रेफर टू'मुळे शासकीय मेडिकलवर अतिरिक्त ताण वाढत आहे. कमी मनुष्यबळ असल्याने उपचार करताना डॉक्‍टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह व मृतांचा आकडे दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तरीदेखील नागरिक आपली बेफिकरी सोडायला तयार नाहीत. परिणामी कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे.

गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, आयसोलेशन वॉर्डात तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत. प्रत्येक रुग्णाचा जीव वाचविता यावा, यासाठी डॉक्‍टरांसह कर्मचारी दिवसरात्र एक करीत आहेत. एकूण 577 खाटा उपलब्ध असल्या तरीदेखील सध्यस्थितीत गर्दी झालेली आहे.

विशेष म्हणजे पॉझिटिव्ह येताच लक्षणे नसणारेही उपचारासाठी मेडीकलमध्येच धाव घेतात. अशा रुग्णांनी जवळपास शंभर खाटा गुंतवून ठेवल्या आहेत. लक्षणे नसणाऱ्यास सीसीसी सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिल्यास राजकीय दबाव वापरला जातो. त्यामुळे गंभीर रुग्णांना फिवर ओपीडीमध्ये वेटींगवर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. दिवसाला 80 ते शंभर रुग्ण दाखल होण्यासाठी येत आहेत. त्या तुलनेत रुग्णांना कमी संख्येत सुटी मिळत असल्याने खाट मिळविण्यासाठी प्रतिक्षेवरच राहावे लागत आहेत.

खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास अखेरच्या क्षणी त्यालाही शासकीय मेडीकलमध्येच पाठविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोविड रुग्णांनी हॉस्पिटल हाऊसफुल्ल असून, ऑक्‍सिजनच्या मागणीतही वाढ झाली आहे. दिवसाला 1,100 ते बाराशे जम्बो सिलिंडर लागत आहेत. देवळी व बुटीबोरी येथून सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. मेडीकलमध्ये खाटा वाढविल्या तरी मनुष्यबळ उपलब्ध करणे शक्‍य नाही. त्यामुळे आरोग्य संचालकांनीही खाटा वाढविण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

खासगीत खिशाचे 'माप'

खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याने या मनमानीला जिल्हाधिकाऱ्यांनी चाप लावला आहे. प्रत्यक्षात कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करायचे असल्याचे सर्वप्रथम तेथील प्रशासनाकडून खिशाचे "माप' घेतले जाते. आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने बेडही मिळते व ऑक्‍सिजन तसेच व्हेंटीलेटरचीही व्यवस्था होते. अन्यथा बेड उपलब्ध नाही, असे सांगत रुग्णाला दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला जातो.

एकाही कोविड रुग्णाची गैरसोय होऊ नये, यासाठी डॉक्‍टर व कर्मचारी दिवसरात्र एक करून सेवा देत आहेत. सध्या बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णांना खाट उपलब्ध होईपर्यंत फिवर ओपीडीमध्ये ठेवण्यात येते. व्यवस्था होताच त्यांना वॉर्डात नेले जाते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अखेरच्या क्षणी उपचारासाठी येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाचीदेखील काळजी घेतली पाहिजे.
डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com