...अन् नुकसानीच्या पंचनाम्यात आला वाघ आडवा

मंगेश शेवाळकर
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

तालुक्यात वाघाच्या दहशतीने शेतकरी व शेतमजूर शेतात कामाला जाण्यासाठी घाबरत असल्याचे चित्र आहे. या शिवाय या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यास तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांचे पथक धजावत नसल्याने पंचनाम्यामध्ये वाघाचा अडथळा येऊ लागला आहे. 

हिंगोली : तालुक्यात वाघाच्या दहशतीने शेतकरी व शेतमजूर शेतात कामाला जाण्यासाठी घाबरत असल्याचे चित्र आहे. या शिवाय या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यास तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांचे पथक धजावत नसल्याने पंचनाम्यामध्ये वाघाचा अडथळा येऊ लागला आहे. 

तालुक्यातील कलगाव, लिंबी शिवारात वाघाने चार जनावरांचा फडशा पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शिवाय या वाघाचे दुसरे लोकेशन देखील याच भागात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शनिवारी (ता. २) उमरा वाबळे शिवारात वाघ दिसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

या वाघाच्या दहशतीने शेतकरी व शेतमजूर देखील शेतात कामाला जाण्यासाठी घाबरत आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठीही शेतकरी शेतात जात नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर गावालगत असलेल्या पांदणरस्त्यांनीही कोणी एकटे जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. या वाघामुळे पिक नुकसानीचे  पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांचे पथक देखील शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, त्यामुळे पिक नुकसानीच्या पंचनाम्यात वाघ आडवा आला आहे. वाघाचे लोकेशन पाहण्यासाठी तसेच वाघाची माहिती घेण्यासाठी सर्वच यंत्रणा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहे. मात्र वाघाची हालचाल झाल्यानंतरच दर सहा तासांनी वाघाचे लोकेशन मिळत असल्याने नेमके वाघ कोठे आहे याची नेमकी माहिती सांगणे वन विभागालाही कठीण झाले आहे. मात्र या परिस्थितीतही विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, जयसिंग कच्छवे, शेख जमील यांचे पथक दिवस रात्र या परिरात गस्तीवर आहेत.

दरम्यान, गावकऱ्यांनी एकटे शेतात जाणे टाळण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी केले आहे. या शिवाय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे  यांचे पथक देखील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay compensation for the damages quickly

टॅग्स