भुईमूगाचा लागवड खर्च एकरी १८ हजार; उत्पन्न ८ हजार

गाेपाल काेळसे
मंगळवार, 22 मे 2018

निदान घरी खाण्यापुरता तरी शेंगा हाेतील व गुरांना चारा मिळेल या आशेने भुईमूग पीक काढण्यास अनेकांनी सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही.

अकोला (राहेर) - पातूर तालुक्यातील राहेर परिसरात गेल्या तीन वर्षापासून उन्हाळी भुईमूगाच्या पिकात सातत्याने घट येत आहे. यंदा तर भुईमूगाचा लागवड खर्च एकरी १८ हजार आला व उत्पन्न आठ हजार झाले. यामुळे भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांचे डाेळे पाणावले आहेत.

निदान घरी खाण्यापुरता तरी शेंगा हाेतील व गुरांना चारा मिळेल या आशेने भुईमूग पीक काढण्यास अनेकांनी सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उत्पादनात घट आल्याने भुईमूगाच्या पेरणीचा तर साेडाच काढणीचा खर्चही निघाला नाही. एका एकरात भुईमूग उपटण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये मजुरी द्यावी लागली. एका एकरात ८ ते १० पाेते शेंगा हाेतात. भाव २८०० ते ३००० रुपये आहे. एका एकरात चार पाेते शेंगा विकल्या तरी आठ हजारच हातात येतात. चार महिने भुईमूगाकडे लक्ष देणे, रात्रंदिवस पाणी दिल्यावर हातात काहीच येत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी भुईमूगाला या वर्षी राम राम ठाेकला ते आज चिंतामुक्त दिसत आहेत.

यावर्षी कुटारही निघाले नाही
६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी भुईमूगाच्या पिकाकडे पाठ फिरविली आहे. मागच्या वर्षी तर पेरणीचा खर्चही निघाला नाही. काही वर्षापासून चाऱ्यापुरता तरी पीक निघत हाेते. यावर्षी तर कुटारही दिसेनासे झाले आहे.

टरबूज लागवडक्षेत्र वाढले
टरबुजाचे पीक अडीच महिन्यात हातात येते. प्रति क्विंटल १२०० ते १५०० रुपये भाव मिळत आहे. टरबुजाचे उत्पन्न एकरी १५ ते २० टन हाेत आहे.

तीन वर्षापासून भुईमूग पिकात शेतकऱ्यांना नुकसान आहे. यावर्षी ७० टक्के शेतकऱ्यांनी भुईमूगाची पेरणी नाकारली. पुढील वर्षी भुईमूगाचे पीक दिसेनासे हाेण्याच्या मार्गावर आहे.
- बंडू पाटील, राहेर

भुईमूग पिकाचा खर्च ३० हजार आणि दाेन एकरात केवळ १२ हजारांच्या शेंंगा झाल्या. मला १८ हजार नुकसान झाले. पुढील वर्षी माझ्या शेतात भुईमूगाचे एकही झाड दिसणार नाही.
- बाळू पाटील, पाचपाेर

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Peanut producing farmer facing loss