फूटपाथवरून वारी, पादचारी मृत्यूच्या दारी!

राजेश प्रायकर
बुधवार, 24 मे 2017

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते होत आहेत. मात्र, रस्ता कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेत समन्वयच नसल्याने सिमेंट रस्ते फूटपाथला समांतर झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी फूटपाथ व रस्ता यातील फरकच नाहीसा झाला. परिणामी वाहनधारक फूटपाथवरूनही वाहने, दुचाकी चालवित असून, एखाद्या पादचाऱ्याला अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न यानिमित्त नागरिक उपस्थित करीत आहेत. 

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते होत आहेत. मात्र, रस्ता कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेत समन्वयच नसल्याने सिमेंट रस्ते फूटपाथला समांतर झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी फूटपाथ व रस्ता यातील फरकच नाहीसा झाला. परिणामी वाहनधारक फूटपाथवरूनही वाहने, दुचाकी चालवित असून, एखाद्या पादचाऱ्याला अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न यानिमित्त नागरिक उपस्थित करीत आहेत. 

शहरातील अनेक फूटपाथ चालण्याच्या लायकीचेच नसल्याने नागरिकांना रस्त्यांवरून चालावे लागत आहे. फूटपाथवरून कुणी चालत नसल्याने अतिक्रमणधारकांनी ते कवेत घेतले आहे.  आता त्यात नव्या सिमेंट रस्त्यांची उंची वाढल्याने फूटपाथ गायब झाल्याची नवी समस्या उभी ठाकली आहे. शहरात महापालिकेचे तीनशे कोटींचे सिमेंट रस्ते होत आहे. अर्थात या कामांचे कंत्राट वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. महापालिकेचे काही सिमेंट रस्ते पूर्ण झाले आहेत. कंत्राटदाराला केवळ सिमेंट रस्त्यांचेच कंत्राट देण्यात आल्याने ते पूर्ण करून मोकळे झाले. आता या रस्त्यांच्या बाजूला ‘रोड शोल्डर’, फूटपाथ, पावसाळी पाणी वाहून जाणाऱ्या  नाल्या तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, सिमेंट रस्ते पूर्ण होऊनही महापालिकेने अद्याप रस्त्याला समांतर झालेल्या फूटपाथला हात लावला नाही. 

कंत्राटदारांकडून पूर्ण झालेला सिमेंट रस्ता फूटपाथपर्यंत आयब्लॉकने जोडण्यात आला. अनेक ठिकाणी रस्ता व फूटपाथ सारख्याच उंचीचे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक आता फूटपाथलाही रस्ता समजून त्यावरून वाहने चालवित आहेत. महापालिकेच्या दिरंगाईमुळे अतिक्रमणधारकांनी फूटपाथ कवेत घेतले, आता वाहनधारकांनी फूटपाथलाच रस्ता करून टाकल्याचे चित्र शहरात दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पुन्हा रस्त्यांचाच आधार घ्यावा लागत असून मोठ्या अपघाताला आमंत्रण देण्यात येत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही रिंग रोडवरील सिमेंट रस्त्यांबाबत हेच धोरण आखले आहे. संपूर्ण रिंग रोड व फूटपाथ समान झाले असून या वर्दळीच्या रस्त्यांवरून एखादवेळी वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्यास फूटपाथवरील नागरिकांचा जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

रस्ते तयार होत आहेत, काही पूर्ण झाले. परंतु, अनेक ठिकाणी रोड शोल्डरही नाही. त्यातच नव्या सिमेंट रस्त्यांमुळे फूटपाथ समांतर झाल्याने महापालिकेने कामे संपताच फूटपाथची कामे सुरू करणे आवश्‍यक आहे. मुळात सिमेंट रस्त्यांचे कंत्राट देताना फूटपाथही कंत्राटदारांकडून करून घेण्याची अट असावी. त्यामुळे रस्ता व त्याला आवश्‍यक उंचीचे फूटपाथ तत्काळ तयार होईल. त्यामुळे महापालिकेचा पैसा व वेळही वाचेल. 
-राजू वाघ, संस्थापक, अपघात मुक्त नागपूर अभियान व जीवन सुरक्षा प्रकल्प. 

सलमान प्रकरणातूनही धडा नाही 
अभिनेता सलमान खानच्या वाहनामुळे १५ वर्षांपूर्वी फूटपाथवर झोपलेल्याचा मृत्यू झाला होता. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजले. अद्याप गाजत आहे. सलमान खानचे वाहन उंच फूटपाथवरही चढले. नागपुरातही विविध परीक्षेच्या निमित्ताने विविध शहरे, राज्यातून विद्यार्थी येत असतात. निवासाची सोय न झाल्यास ते फूटपाथवरच झोपतात. सध्या नागपुरातील रस्ते व फूटपाथ समांतर झाल्याने मोठ्या अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. निदान सलमान खान प्रकरणातून तरी महापालिका धडा घेईल का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Web Title: pedestrian issue