पेंचमध्ये भ्रमंतीचा पेच 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- रस्त्यांची दुरवस्था; महसुलात घट 
- 15 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा 
- यंदा वनपर्यटन दीड महिना उशिरा सुरू होणार 
- पेंच, टिपेश्‍वर, बोर, उमरेड-कऱ्हांडला येथील पर्यटनालाही पावसाचा फटका 

नागपूर : ऑक्‍टोबरच्या अखेरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगल पर्यटनाला बसला आहे. पावसामुळे प्रकल्पातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पर्यटकांसमोर भ्रमंतीचा पेच निर्माण झाला आहे. तसचे फाउंडेशनचा महसूल घटला आहे. प्रकल्पातील रस्ते अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नसून त्याच्या दुरुस्तीनंतर पर्यटनासाठी खुले होण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Image may contain: plant, outdoor and nature

पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावर पाणी जमा झाल्याने पर्यटन करणे अशक्‍य असते. त्यामुळे अडीच महिने जंगल पर्यटनासाठी बंद करण्यात येते. एक ऑक्‍टोबरपासून जंगल पर्यटनासाठी खुले केले जाते. यंदा पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावल्याने 15 ऑक्‍टोबरपर्यंत हे जंगल अंशतः बंद होते. 16 ऑक्‍टोबरपासून पर्यटकांसाठी जंगल उघडले. मात्र, ऑनलाइन बुकिंग बंद असल्याने पर्यटकांची चांगलीच निराशा झाली. त्याचा फटका आता पेंच टायगर फाउंडेशनच्या महसुलाला बसणार आहे. 

Image may contain: one or more people, people sitting, tree, grass, outdoor and nature

पेंच टायगर फाउंडेशनला रिसोर्ट, प्रवेश शुल्कातील काही वाटा मिळत असतो. त्यातून स्थानिकांना रोजगार आणि त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. यंदा वनपर्यटन दीड महिना उशिरा सुरू होत असल्याने फाउंडेशनच्या महसुलात घट होणार आहे. तसेच रिसोर्ट संचालक आणि गाइडच्याही रोजगारावर परिणाम होणार आहे. 

पेंच, टिपेश्‍वर, बोर, उमरेड-कऱ्हांडला येथील पर्यटनालाही पावसाचा फटका बसला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसाने जंगलातील अनेक रस्ते अद्याप खराब अवस्थेत आहेत. त्यामुळेच जंगल पर्यटनाचे ऑनलाइन बुकिंग 31 ऑक्‍टोबरपासून सुरू केले नव्हते. आता एक नोव्हेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे पर्यटकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, पेंच प्रशासनासमोर रस्ते दुरुस्तीचे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. पावसामुळे रस्त्याची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. 

 
 

Image may contain: 1 person, suit
डॉ. रविकिरण गोवेकर

सततच्या पावसामुळे टिपेश्‍वर, पेंच, नागलवाडी आदी प्रकल्पांतील रस्ते खराब झालेले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबधित कामाची निविदा काढावी लागणार आहे. त्याला बराच कालावधी लागणार असून निसर्ग पर्यटनासाठी डिसेंबर महिना उघडू शकतो. 
- डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक, पेंच व्याघ्र प्रकल्प. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pench tourist news