"रविवारी कोरोना सुटीवर जातो का"? कोण विचारत आहे हा सवाल आणि का? वाचा  

मिलिंद उमरे 
Sunday, 23 August 2020

जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या खंबीर कामगिरीमुळे आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रकोप दिसून येत नाही.

गडचिरोली : जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासन अतिशय गंभीरतेने काम करत आहे. त्यासाठी रविवारी सारीच दुकाने, विक्री केंद्रे बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश दिले आहेत. पण, रविवारी अनेक ठिकाणी चिकन, मटण, मासेविक्रीची दुकाने सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दुकानदारांसाठी व ग्राहकांसाठी रविवारी कोरोना सुटीवर, तर जात नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या खंबीर कामगिरीमुळे आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रकोप दिसून येत नाही. मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचे सत्र सुरू झाले. पण, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ एक मृत्यू झाला आहे. या मृत्यू ज्या व्यक्तीचा झाला त्याला हृदयविकार असल्याने खरेच कोरोनामुळे मृत्यू आला का, हेही ठामपणे सांगता येत नाही.

उघडून तर बघा - चिमुकल्यांची आर्तहाक... ‘बाबाऽऽ प्लीज, तुम्ही जेथे असाल तेथून घरी परत या...'

अनेक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूसत्र सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी उचललेल्या कठोर पावलांमुळे त्याला वेशीवरच थांबविण्यात यश आले. पण, अनेकजण सरकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. 

सर्रास होते मांसाहाराची विक्री 

या बेजबाबदार वृत्तीमुळे प्रशासनाचे परीश्रम पाण्यात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी पूर्णपणे बंद पाळण्याचे आदेश दिले असतानाही सकाळपासून अनेक ठिकाणी चिकन, मटण, मासळीची विक्री होताना दिसत आहे. काहीजण घरी, जर काहीजण थेट दुकान उघडून सर्रास विक्री करतात.

रविवारी (ता. 23) येथील कारगिल चौकातील मासळी बाजार नेहमीप्रमाणेच सुरू होता. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास कोरोनाचा प्रकोप वाढण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

दंड भरू, पण विक्री करू...

जिल्हा प्रशासनाने रविवारी सारीच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही अनेक मांस विक्रेते मुजोरीने आपली दुकाने सुरू ठेवतात. नगर परिषद व जिल्हा प्रशासनाचे पथक त्यांच्यावर कारवाई करते. पण, ते दंड भरून पुन्हा विक्री सुरूच ठेवतात. त्यामुळे "दंड भरू, पण विक्री करू' हेच धोरण या विक्रेत्यांनी स्वीकारले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People are rushing for buying meat in markets in gadchiroli