जनतेचा सरकारवर विश्‍वास नाही - पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - आरक्षणासाठी मराठा समाजाकडून राज्यभर काढण्यात येत असलेले मोर्चे सरकारच्या विरोधात नसून, विस्थापितांचा प्रस्थापितांच्या विरोधातील आक्रोश असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित कोण, हे समजून घ्यावे असे सांगतानाच सरकारवर जनतेचा विश्‍वास नसल्याने मोर्चे निघत असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारवर चढविला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार निवास येथे आयोजित नागपूर विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मराठा आरक्षणाचे समर्थन करताना पवार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित कोण हे समजून घेण्याची गरज आहे. राजकारण्यांना दर पाच वर्षांनी नागरिकांच्या दरबारी जावे लागते. त्यांनी नाकारले तर घरी बसावे लागते. त्यामुळे राजकारण्यांना प्रस्थापित म्हणता येणार नाही. निवडणूक हरले की ते विस्थापित होतात. खरे प्रस्थापित आहेत ते शासकीय नोकरदार. कारण नोकरीने जीवन स्थिरावते. 

सरकारवर जनतेचा विश्‍वास हवा. पूर्वीच्या सरकारवर तो होता. त्यामुळे मोर्चे निघाले नाही. आताच्या सरकारवर मात्र त्यांचा विश्‍वास नसल्याने मोर्चे निघत आहेत, असे सांगून कुणाच्या अधिकाराला धक्का न लावता मराठ्याना आरक्षण द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली. 

आघाडीचे स्पष्ट संकेत
विधानसभेत स्वबळाच्या धाडसी प्रयोगामुळे विरोधात बसावे लागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पुन्हा हातात हात घेऊन उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात पत्रकारांशी वार्तालाप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तसे स्पष्ट संकेत दिले. 

वेगळ्या विदर्भावर निर्णय घ्यावा
वेगळ्या विदर्भावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका लोकभावनेचा आदर करणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास विदर्भ वेगळा करण्याचे आश्‍वासन दिले होते. भाजपच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख होता. धनगरांना आरक्षण देण्याची भाषाही त्यांनी निवडणुकीपूर्वी केली होती. सध्या केंद्र आणि राज्यातही सत्ता असल्याने भाजपने हे आश्‍वासन पूर्ण करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

Web Title: People do not trust the government