Video : यातना फाळणीच्या : बिबाबाईने पाहिली रेल्वेतून प्रेतं फेकताना

संदीप रायपुरे/नीलेश झाडे
Thursday, 23 January 2020

पाकिस्तानातील जल्लारपूर, छतवाडा, दुनियापार, लोद्रा या गावांतून त्यांच्यासह हजारो लोक तेथील घरदार सोडून रेल्वेने भारतात आलेत. हिंसाचारात अनेकांना प्राणही गमवावे लागले. आपला भाऊ अन्‌ पुतण्याचाही त्यात बळी गेल्याचे बिबाबाई सांगतात. प्रवासात अनेकांचे मृतदेह चालत्या रेल्वेतून बाहेर फेकल्याची आठवण त्यांना आहे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सावली तालुक्‍यातील किसाननगर. फाळणीच्या वेदना जगणारे हे गाव. या गावातील बहुतेकांचे पूर्वज सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत होते. भारत-पाकिस्तानचे विभाजन व त्यानंतरचा रक्तपात, या घटनाक्रमाच्या प्रत्यक्ष साक्षीदार आणि बळी ठरलेल्या तीन महिला अजूनही किसाननगरात आहेत. फाळणीच्या कटू आठवणी घेऊन त्या जगत आहेत. 

चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील किसाननगर हे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावात 'औड' या एकाच समुदायाचे लोक वास्तव्यास आहेत. मूळ पाकिस्तानचा रहिवासी असलेला हा समाज फाळणीनंतर भारतात आला व किसाननगर हे गाव वसवून येथेच स्थायिक झालेत. उसळलेल्या हिंसाचारात पाकिस्तानातील जल्लारपूर ते भारतातील किसाननगरपर्यंतच्या प्रवासाच्या साक्षीदार असलेल्या तीन महिला गावात आहेत. 

बापरे! - विवाहित मैत्रिणीला भररस्त्यात केली ही मागणी... वाचा काय झाले नंतर

नव्वदी पार केलेल्या या तिघींनी इतिहासाच्या त्या क्रूर आठवणींना जिवंत ठेवले आहे. त्यातीलच एक आहे बिबाबाई मजओके. त्या पंधरा वर्षांच्या असताना विभाजन झाले. पाकिस्तानातील जल्लारपूर, छतवाडा, दुनियापार, लोद्रा या गावांतून त्यांच्यासह हजारो लोक तेथील घरदार सोडून रेल्वेने भारतात आलेत. हिंसाचारात अनेकांना प्राणही गमवावे लागले. आपला भाऊ अन्‌ पुतण्याचाही त्यात बळी गेल्याचे बिबाबाई सांगतात. प्रवासात अनेकांचे मृतदेह चालत्या रेल्वेतून बाहेर फेकल्याची आठवण त्यांना आहे. 

बिबाबाईसह शेकडो कुटुंबीय भारतात सुखरूप पोहोचली. त्यांना सुरुवातीला अलाहाबाद, कुरुक्षेत्र, भोपाल येथील कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीजवळील जंगलातील वीस एकर जागेत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या गावाला किसाननगर हे नाव देण्यात आले. तेव्हापासून ही सारी मंडळी किसाननगरात वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतेकांचे पूर्वज सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेत होते. त्यांच्या शौर्याचा ऐतिहासिक ठेवा फाळणीदरम्यान झालेल्या हिंसाराचामुळे येथे आणता आला नाही, याची खंत त्यांना आहे. 

जातपडताळणी प्रमाणपत्र नाही

किसाननगरात वास्तव्यास असलेल्यांची जात "औड' आहे. ती "एनटी' या प्रवर्गात येते. सुरुवातीला राजपूत भामटा ही त्यांची जात होती. पण, सरकारने एक निर्णय घेऊन या जातीत बदल केला. किसाननगरातील अनेक मुले चांगले शिक्षण घेत आहेत. अनेक जण नोकरीही करतात. पण, जातपडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अधिक माहितीसाठी - 'ती' उपचारादरम्यान म्हणाली दोन पैसे जमा करा, मुलांचा सांभाळ करा

गीतातून फाळणीच्या वेदना

फाळनीनंतर तर भारतात पोहोचताना वाट्याला आलेल्या वेदना बिबाबाई अद्यापही विसरू शकल्या नाही. आज नव्वद वर्षांच्या असतानादेखील त्यांनी फाळणीदरम्यान झालेल्या रक्तपातावर लिहिलेले गीत पूर्ण आठवते. 
सून लो तुझे पंजाब दे, पुरदर्दे नजारे, 
हाय खुन की होली खेली, गैरों के साहारे 
विधवा हुई नारीया, यतिम रौंदेनी 
बच्चे भुखे प्यासे मरते, खुन कि नदिया बहती...
 

Image may contain: 1 person, standing and outdoor
बिबाबाई मजओके

'आझाद हिंद'च्या नोटा

एप्रिल 1944 मध्ये बर्माची (म्यानमार) राजधानी रंगून येथे आझाद हिंद बॅंकेची स्थापना करण्यात आली होती. या बॅंकेने 5, 10, 100, 150, 1000 व 1 लाख रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. हजाराच्या नोटेवर डाव्या बाजूला सुभाषचंद्र बोस यांचा फोटो तर मध्यभागी "तुम मुझे खुन दो, मैं तुम्हे आझादी दूंगा', हे घोषवाक्‍य व उजव्या बाजूला "जय हिंद' लिहिले होते. या नोटा आझाद हिंद सेनेच्या जवानांकडे होत्या. आमच्या पूर्वजांकडे या नोटा होत्या, असे किसाननगर येथील 85 वर्षीय केशूबाई बिके यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The people of Pakistan live in the kisan nagar of Chandrapur