गावाच्या नावातच 'साक्षर' मात्र बिनधास्त सुरू ढोंगीबाबाचे खेळ; कारवाईस पोलिसही करतात टाळाटाळ  

सुधीर भारती
Tuesday, 13 October 2020

 नावात जरी साक्षर असले तरी या गावात भोंदूबाबावर विश्वास ठेवणारे लोक कमी नाहीत. इतकेच काय तर पोलिससुद्धा या ढोंगी बाबाला अटक करायला टाळाटाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भंडारा : एखाद्या गावाच्या नावातच 'साक्षर' शब्द असेल तर त्या गावातील सर्वजण शिकलेले म्हणजे साक्षर असतील असा विचार आपण करू. पण असा विचार शुद्ध चुकीचा आहे. नावात जरी साक्षर असले तरी या गावात भोंदूबाबावर विश्वास ठेवणारे लोक कमी नाहीत. इतकेच काय तर पोलिससुद्धा या ढोंगी बाबाला अटक करायला टाळाटाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

डोंगरगाव (साक्षर) येथे मुलीला भूतबाधा झाली असून, ढोंगीबाबाच्या सांगण्यावरून तीन गावकऱ्यांवर जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, त्या बाबावर कारवाई करण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहेत. यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्‍यता असून, लवकर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

पालांदूर पोलिस ठाणेअंतर्गत डोंगरगाव (साक्षर) येथे एका मुलीला मार्च महिन्यापासून भूतबाधेने पछाडले आहे. ती गावातील लोकांनी जादूटोणा, करणी केल्याचा आरोप करून गावात तणाव निर्माण करीत आहे, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, प्रा. युवराज खोब्रागडे, प्रा. नरेश आंबिलकर, डॉ. प्रवीण थुलकर, डॉ. विश्‍वजित थुलकर यांनी डोंगरगाव येथे जाऊन भूतबाधा अंगात आणणाऱ्या मुलीची भेट घेतली. 

तेव्हा तिने लीलाधर ब्राह्मणकर रा. मुरमाडी/तुपकर या ढोंगीबाबाचे नाव सांगितले. त्यानुसार अंनिसच्या पथकाने त्या बाबाच्या दरबारात भेट दिली. तेव्हा बाबा आसनावर बसले होते. आपल्या अंगात दादाजी धुनीवाले बाबा यांची अतींद्रिय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या बाबाचा दरबार सुरू होता.

त्यावेळी दोन महिला त्याच्याकडे आपल्या समस्या सोडविण्यासाठी आल्या होत्या. विष्णुदास लोणारे यांनी बाबाला एक समस्या सांगितली. त्यासाठी बाबाने अंगाऱ्याच्या तीन पुड्या देऊन दक्षिणा म्हणून दहा रुपये घेतले. तसेच तुमच्या मुलीला बाहेरबाधा झाल्याने तिला दरबारात आणण्यास सांगितले.

हेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

यानंतर अंनिस सदस्यांनी सर्व घटनेची माहिती पालांदूरचे ठाणेदार दीपक पाटील यांना देऊन ढोंगी बाबा समाजात अंधश्रद्धा पसरवीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली. ठाणेदारांनी पाच दिवसांत कारवाई करतो, असे सांगितले. मात्र, अजूनपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे डोंगरगाव येथे अंधश्रद्धेतून मोठी घटना घडण्याची शक्‍यता असून, ढोंगी बाबावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांना विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, प्रा. युवराज खोब्रागडे, डॉ. नरहरी नागलवाडे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people in this village is trusting on bhondu baba nad police also