"परफेक्‍ट गुन्हा कधीच होऊ शकत नाही' अखेर पोलिसांचेच खरे !

file
file

कामठी (जि.नागपूर) : पोलिसांमध्ये एक वाक्‍य भरपूर वेळा उच्चारले जाते ते म्हणजे "परफेक्‍ट गुन्हा कधीच होऊ शकत नाही' त्याची प्रचिती कामठीत गुरुवारला झालेल्या खून प्रकरणात दिसून आली. स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेरी शिवारात मुकेश अर्जुनसिंह यादव याचा खून करून पुरावा मिटविण्यासाठी जाळून फेकून दिला होता. मात्र, पोलिसांनी तर्क लावून गुन्हेगारांचा शोध घेतला आहे.

चार आरोपींना अटक
ही घटना गुरुवारी उघडकीस आल्यानंतर पोलिस आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात श्रुती संजय मिरे (वय 22, रा. महालगाव, ता. कामठी) हिचा समावेश असून, इतर तीन आरोपींमध्ये पवन कुंभलकर (वय 26, रा. कांद्री), शुभम सरोदे (वय 22, रा. बाळापूर, जि. अकोला), सिद्दिकी ऊर्फ शेरू मोहम्मद शाबीर (वय 22, रा. इतवारी, नागपूर) यांना अटक केली आहे. चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी कार तसेच मृताची दुचाकी जप्त केली आहे. मात्र, अद्याप खुनाचे मूळ कारण गुलदस्त्यात आहे. सविस्तर असे की, येथील यादवनगर कामठीत राहणारा 48 वर्षीय मुकेश अर्जुनसिंग यादव हा बुधवारी 4 डिसेंबरच्या सकाळी आठपासून दुचाकीने निघाला होता व थेट रामटेक येथील सासुरवाडीत गेला. तेव्हापासून तो घरी परतला नव्हता. गुरुवारी (ता. पाच) नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील नेरी शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या मानेवर जखमा असल्याने पोलिसांचा संशय बळावला. सर्वच पोलिस स्टेशनला बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची तपासणी केली. मात्र, मृत कोण, याचा पत्ता लागत नव्हता. शुक्रवारी पोलिसांना मुकेशच्या घरच्या सदस्यांनी मुकेश बेपत्ता असल्याचे सांगितले. मेयो येथे ठेवण्यात आलेले शव मुकेशची पत्नी मंजू हिला दाखविण्यात आले. अखेर शनिवारी खात्री करून ओळख पटवून घेतली.

असा केला खून
मृत मुकेश यांचा मालकीचा डुमरी येथे ड्रीम पॅलेस नावाचा ढाबा आहे. लगतच लॉजही आहे. दोन महिन्यांपूर्वी मुकेशने कन्हान येथील पवन कुंभलकरला भाड्याने दिला होता. तरीही मुकेश हा धाब्यावर जाऊन बसत होता. यातून पवनच्या मनात गैरसमज निर्माण झाला. मुकेशमुळे येणारे ग्राहक येण्यास भितात हाच समज मनात ठेवून 4 डिसेंबरच्या रात्री मुकेशचा लॉजमध्येच खून केला. चारचाकी वाहनातून त्याला नवीन कामठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर मार्गावरील एका शेतात जाळून टाकले. यात पवनला रूमबॉय शेरू याने मदत केली. सोबतच लॉजमध्ये राहणारा शुभम व त्याच्या मैत्रीणीने खून करण्यासाठी मदत केल्याचे समोर आले आहे. रक्ताने माखलेल्या भिंती व चादरी शुभमची मैत्रीण श्रुती हिला धुण्यास सांगितले. आरोपीपर्यंत पोहोचण्यास तांत्रिक पद्धतीचा आधार घेण्यात आला. अखेर खऱ्या आरोपींना गजाआड केले. या सर्व आरोपींना सोमवारला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

अशी पटली मृतदेहाची ओळख
घरी न परतल्याने पत्नी मंजू हिने मोबाईलवरून मुकेशच्या मोबाईलवर फोन केले. मात्र, फोन लागत नसल्याने चिंता अधिकच वाढली होती. दुसऱ्या दिवशी एका अनोळखी इसमाचा मृतदेह नेरी मार्गावरील जागेत आढळल्याने हा मृतदेह मृत मुकेश यादवचा असावा, असा दावा घरच्यांनी केल्याने पोलिसांनी खात्री करीत ओळख पटवून नेण्यासाठी पत्नी मंजूला नागपूर येथील मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात नेले. मागील वर्षी मुकेशच्या उजव्या पायाच्या तळपायाला लागलेल्या टाक्‍यावरून ओळख पटविण्यात आली.

पाच वर्षांपूर्वी परतला होता कुटुंबात
मुकेश हा 1992 मध्ये पारशिवनीच्या वऱ्हाडा गावातील रेड्डी हत्याकांडात खुनाच्या आरोपाखाली वीस वर्षे शिक्षा भोगून पाच वर्षांपूर्वी कुटुंबात आला होता. कारागृहातून परतल्यानंतर त्याचा विवाह झाला होता. सुखी जीवनाची वाटचाल धरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com