आनंदाची बातमी : बालरोगतज्ज्ञांसाठी मेळघाटात स्थायी घरे

सुधीर भारती 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मेळघाटात सेवा देण्यास एमबीबीएस डॉक्‍टर्स फारसे इच्छुक नसतात. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, अर्भक मृत्यूचा आकडा पाहता या भागात बालरोगतज्ज्ञांची नितांत आवश्‍यकता आहे.

अमरावती : मेळघाटमधील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बालरोगतज्ज्ञांसाठी मेळघाटमध्ये स्थायी घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासंदर्भातील प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. 

बीएएमएस डॉक्‍टरांची सेवा 

मेळघाटात सेवा देण्यास एमबीबीएस डॉक्‍टर्स फारसे इच्छुक नसतात. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, अर्भक मृत्यूचा आकडा पाहता या भागात बालरोगतज्ज्ञांची नितांत आवश्‍यकता आहे. मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात राहून सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांचा सातत्याने तुटवडा आहे. पर्यायाने बीएएमएस डॉक्‍टरांची सेवा घेतली जाते. मेळघाटातील दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात संचार व्यवस्था नसणे, वाहतुकीच्या साधनाची अनुपलब्धता या समस्या तर आहेच, मात्र सर्वात मोठी समस्या आहे ती निवासस्थानांची. मेळघाटात डॉक्‍टर तसेच शिक्षकांसाठी राहण्याची स्थायी व्यवस्थाच नसल्याने अनेक डॉक्‍टर्स जवळच्या परतवाडा किंवा अमरावतीवरून अप डाउन करतात. डॉक्‍टर्स मुख्यालयी हजर राहत नसल्याची सातत्याने ओरड होत आहे.

चिंताजनक बनली

त्यामुळे आता मेळघाटमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर बालरोगतज्ज्ञांसाठी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाकडून राज्यशासनाची परवानगी मिळविण्यात आली असून लवकरच प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. बालरोगतज्ज्ञांच्या अभावी मेळघाटातील बालमृत्यूची आकडेवारी वाढत असून ही बाब चिंताजनक बनली आहे. पुरेशा सोयी उपलब्ध करून दिल्यास बालरोगतज्ज्ञसुद्धा याठिकाणी सेवा देण्यास तयार होतील, असा यामागील कयास आहे. त्यामुळेच डॉक्‍टरांसाठी स्थायी निवासस्थाने तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

सामान्यपणे बालरोगतज्ज्ञांची मेळघाटमध्ये गरज आहे. मात्र स्थायी निवासस्थाने नसल्याने अनेक अडचणी आहेत. ती लक्षात घेता आता मेळघाटात आरोग्य विभागाकडून स्थायी निवासस्थाने बांधण्याची कल्पना पुढे आली आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permanent homes in Melghat for pediatricians