जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर युरो-4 इंधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

प्रदूषण होणार कमी - देशातील 12 जिल्ह्यांत नागपूरचा समावेश

प्रदूषण होणार कमी - देशातील 12 जिल्ह्यांत नागपूरचा समावेश
नागपूर - देशभरात एक एप्रिलपासून युरो-4 मानक असलेले पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, देशभरात एकाचवेळी युरो-4 मानक असलेले इंधन पोहोचण्यास वेळ लागणार असला तरी नागपूरसह देशातील 12 जिल्ह्यांत हे इंधन पोहोचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर आता युरो-4 मानक असलेले इंधन मिळू लागले आहे.

पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याची निवड केली असून एक एप्रिलपासून बीएस-4 इंजिनच्या गाड्यांची विक्री सुरू झाली. त्या पाठोपाठ आता युरो-4 इंधन पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासूनच या इंधनाचा पुरवठा प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील सर्वच पंपांवर केला जात होता. एक एप्रिलपासून त्याचे नियमितीकरण करण्यात आले आहे, असे पेट्रोल पंप ऍण्ड डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदर भाटिया यांनी सांगितले.

पाच दिवसांत शहरातील 85 पंपांवर युरो-4 इंधन पोहोचले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 250 पंपांवरही या इंधनाचा पुरवठा सुरू झालेला आहे. भारत, एचपीएल आणि इंडेन या सर्वच कंपन्या मानकानुसार इंधनाचा पुरवठा करीत आहेत.

पीपीएमचे प्रमाण कमी
2000 साली भारतात युरो मानकाची सुरुवात झाली. एक एप्रिलपर्यंत या कंपन्या भारत स्टेज तीननुसार इंधनाचा पुरवठा करीत होते. युरो 3 डिझेलमध्ये 350 पीपीएम (पार्टस पर मिलियन) होते. युरो 4 मध्ये फक्त 50 पीपीएम सल्फर राहणार आहे. युरो 3 पेट्रोलमध्ये सल्फरचे प्रमाण 150 पीपीएम होते. ते युरो 4 मध्ये फक्त 50 पीपीएम राहणार आहे.

काय आहे युरो-4
युरो-4 इंधनात सल्फरचे प्रमाण कमी आहे. ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे. हळूहळू देशातील सर्वच जिल्ह्यांत युरो-4 पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जात आहे. युरो-4 इंधनमध्ये सल्फरची मात्रा कमी असल्याने वायू प्रदूषण नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. वाहनांमधील धुराचे प्रमाणही कमी होणार आहे.

Web Title: petrol pump euro-4 fuel in nagpur district